-
शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
-
कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.
-
रामदास कदम यांच्या एका पत्रानंतर ही कारवाई शिवसेनेनं केली आहे. मात्र रामदास कदम यांनी शिवसेनेवर टाकलेल्या या लेटरबॉम्बमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली? यावरच आपण या गॅलरीमधून नजर टाकूयात…
-
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करुन राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नगरसेवक आणि नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असतानाच आता शिवसेनेचे कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला.
-
रामदास कदम यांनी आपण पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठवलं. हे पत्र समोर आल्यानंतर काही तासांमध्येच रामदास कदम यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचं पत्र शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलं.
-
रामदास कदम यांनी शिवसेनेविरोधात नाराजी जाहीर करणारं पत्र प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केल्याचं उद्धव ठाकरेंना म्हटलं. त्याचप्रमाणे रामदास कदमांनी राजीनामा देण्यामागील कारणंही पत्रात सांगितली.
-
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती,” या ओळीने रामदास कदम यांनी पत्राची सुरुवात केली.
-
पुढच्याच ओळीमध्ये त्यांना बाळासाहेबांच्या निधनानंतर या पदाचा किंमत राहिली नसल्याची खंत बोलून दाखवली.
-
“शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं,” असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
-
“आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही,” असा थेट उल्लेख कदम यांनी या पत्रात केलाय.
-
“उलटपक्षी मला व माझ्या मुलाला म्हणजेच आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले,” असंही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.
-
“विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही,” अशी आठवणही रामदास कदम यांनी पत्रात सांगितलीय.
-
“मीडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही असं मला सांगण्यात आलं. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही,” असंही रामदास कदम या पत्रात म्हणतात.
-
“मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे,” असंही ते पत्रात म्हणालेत.
-
“ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक्ष शिवसैनिक याचा साक्षीदार आहे,” असं कदम यांनी आपलं शिवसेनेसोबत असणारं नातं सांगताना म्हटलंय.
-
“२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत सरकार बनवत होतात त्यावेळीही मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा होईल, अशी आपल्याला विनंती केली होती,” असंही रामदास कदम म्हणालेत.
-
“पण आपण त्यावेळी माझं ऐकलं नाही. याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे,” असंही कदम म्हणालेत.
-
“शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज ‘शिवसेना नेता’ या पदाचा राजीनामा देत आहे,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
आता रामदास कदम शिंदे गटासोबत जातात का हे येणारा काळच सांगेल.
-
रामदास कदम हे मागील बऱ्याच काळापासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील काही खात्यांच्या कामाकाजावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
-
हा सर्व संताप कदम यांनी आज व्यक्त केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
-
हे पाहा राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेलं पत्र. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)
