-
शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम आक्रमक झाले असून उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उभा राहत नाही असं सांगत रामदास कदम यांनी हल्लाबोल केला आहे. मातोश्रीवर बसून हकालपट्टी करणं एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत…
-
शिवसेना नेतेपदाचा राजीमाना दिल्यानंतर रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूदेखील वाहत होते.
-
“उद्धव ठाकरे अशी किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत. ५० आमदारांची हकालपट्टी केली आहे, आता १२ खासदार जाणार त्यांची हकालपट्टी तुम्ही करणार आहात. शिवाजीराव अढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक जात आहेत त्यांची हकालपट्टी करणार आहात. मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.
-
हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
-
“मी गेल्या ५२ वर्षांपासून शिवसेनेसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक यासाठी साक्षीदार आहे. दंगली झाल्या तेव्हा तिथे मी पोहोचलो होतो. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे फुटले तेव्हा मीच संघर्ष केला,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
“नारायण राणे गेले तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या सीटवर मी बसलेलो असायचो याची आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, तर मी तुम्हाला माझ्या मनातून काढलं आणि आधी राजीनामा फेकला,” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
“५२ वर्ष काम करणाऱ्या एका शिवसैनिकावर राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आत्मपरीक्षण करा. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ आमदारांनी शिवसेना वाचवली असल्याने मी त्यांचे आभार मानतो,” असं प्रतिपादन रामदास कदम यांनी केलं.
-
“माझ्या मुलाच्या मतदारसंघात १० कोटींचा निधी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कसा दिला, त्याची यादीच देतो आता मी. ही अवस्था शिवसेनेच्या सर्व आमदारांची आहे. अजित पवारांनी एक कलमी कार्यक्रम सुरू केला होता. ते सकाळी ७ वाजता मंत्रालयात जात होते. या माणसानं डाव साधला. जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत, तिथे त्यांच्या पडलेल्या आमदाराला निधी देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यांचं १०० चं टार्गेट होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचा बसवला आणि अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्यामुळे त्यांनी तो डाव साधला”, असा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला.
-
“एकनाथ शिंदे आणि आमदारांनी निर्णय घेतला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते,” असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
-
“उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नव्हती, करोना होता हे मान्य. पण शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडत आहेत याचे फोटो मी तुम्हाला पाठवले होते. शिवसेनेतून कुणबी समाजाला फोडून त्यांना पदं द्यायची, पाच कोटी दिले. तुम्ही मुख्यमंत्री असतानाही शरद पवार शिवसेना फोडत आहेत. सगळे आमदार सांगत असतानाही तुम्ही शरद पवारांना सोडत नव्हता,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
-
“ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करुन हिंदुत्व उभं केलं, ते आज जिवंत असते तर यांच्यासोबत युती करत हे पाप करुन दिलं असतं का?,” अशी विचारणा रामदास कदम यांनी केली आहे.
-
“शरद पवार अखेर शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, त्यांचा डाव यशस्वी झाला. शरद पवारांना बाळासाहेब असताना जे जमलं नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन केलं,” असंही ते म्हणाले.
-
अडीच वर्षात हे घडलं म्हणून नशीब, अन्यथा पाच वर्षात संपूर्ण शिवसेना संपली असती असंही रामदास कदम यांनी सांगितलं.
-
“हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यात एकत्र कसा येता येईल यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले पाहिजेत,” असा सल्ला रामदास कदम यांनी दिला आहे.
-
गुवाहाटीत जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत तयार केलं होतं. पण येथे आजुबाजूला असलेले नेते बैल, कुत्रे, रेडे आणि महिला आमदारांना वेश्या म्हणू लागले. हा काय बिहार आहे का?,” असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.
-
“मी उद्यापासून एकनाथ शिंदेंसोबत जाणार, सभा, बैठका घेणार पण कोणालाही मातोश्रीवर बोलू देणार नाही, उद्धव ठाकरेंवर टीका करु देणार नाही. जे शरद पवार, अजित पवार यांना हवं आहे ते होऊ देणार नाही,” असंही ते म्हणाले.
-
उद्धव ठाकरेंनी आजुबाजूला अनिल परब यांच्यासारखे जे लोक बसले आहेत त्यांच्या पार्श्वभागावर लाथ घालून हाकलून द्यावं. शिवसेना पूर्ण संपण्याची वाट पाहू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
-
“मी १९७० सालापासून गेली ५२ वर्ष शिवसेनेचं काम केलं आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या घोषवाक्याकडे आकर्षित होऊन मी पक्षाच्या कामासाठी झोकून दिलं आहे. माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं की माझ्यावर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल. आमचं उतरतं वय आहे. माझं ७९ वय सुरू झालं आहे. आमच्या आयुष्याची संध्याकाळ पक्षाच्या माध्यमातून अंधकारमय होईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं”, असं रामदास कदम म्हणाले आहेत.
-
“मी उद्धव ठाकरेंना हात जोडून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसू नका. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत संघर्ष करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म संघर्ष केला. हिंदुत्व वाढवलं. आज सगळ्या जगात हिंदु ह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. साहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकरतोय”, असं कदम यावेळी म्हणाले.
-
“मी उद्धव ठाकरेंना हे सांगून त्या दिवशी मी मातोश्रीवरून बाहेर पडलो, तो आजपर्यंत मातोश्रीची पायरी चढलो नाही. मला हे सहन झालं नाही. हा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांचा नाहीये. शरद पवारांनी शेवटी डाव साधला. आमच्या मनात भीती होती तेच झालं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेब भोळे आहेत. बाळासाहेब भोळे नव्हते. उद्धव ठाकरे भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना समजला नाही. आज शरद पवारांनी आमचा पक्ष फोडलाय”, असं रामदास कदम यावेळी म्हणाले.
-
“आदित्य ठाकरेंचं वय काय आणि आमदारांना काय बोलतायत याचं भान ठेवा,” असंही त्यांनी सुनावलं.
-
आदित्य ठाकरे हे कोणतंही शासकीय पद अथवा मंत्रीपद नसताना आधी आपल्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि अधिकाऱ्यांच्या बैठकी घेण्यासाठी सांगायचे असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
-
“प्लास्टिकबंदी मी केली क्रेडीट आदित्य ठाकरेंना दिलं. मातोश्री मोठी होऊ द्या आपली असा विचार केला. मला कुठं माहिती होतं तेच आदित्य ठाकरे जे कालपर्यंत मला काका काका म्हणत होते ते मंत्रालयात माझं खातं घेऊन बसणार आहेत,” असा टोला कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
-
“आदित्यसाहेब… आता मला साहेब म्हणावं लागतं भाऊ. काय करणार?”, असा टोला कदम यांनी लगावला आहे. “माझं वय ७० आहे पण आदित्यलाही मला साहेब म्हणावं लागतंय. म्हणतोय साहेब कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीमधले आहेत,” असं कदम यांनी म्हटलं.
-
(Photos: Social Media)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”