-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेची बंडखोरी, मनसेमागे पवारांचा हात असल्याचा आरोप ते अगदी शिंदे गटाचं मनसेत विलिनीकरणाचा मुद्दा अशा अनेक विषयांवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली आहेत. त्यांची अशीच २० महत्त्वाची विधानं…
-
१. बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने माणसं बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचाराने बांधलेली ती माणसं होती – राज ठाकरे
-
२. माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती गोष्ट ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपाने ना अजून कोणी. याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल – राज ठाकरे
-
३. उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना एकदा फुटलेली नाही. आज आमदार बाहेर पडले तेव्हा आणि मी बाहेर पडलो तेव्हाही कारणं हीच होती. मध्यंतरी आणखी काही लोक सोडून गेले तेव्हीही कारणं हीच होती – राज ठाकरे
-
४. संजय राऊतांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. ते रोज सकाळी टेलिव्हिजनवर येतात, अहंकारात रोज काही ना काही बोलतात. त्याने लोक वैतागले आहेत. ते तेवढ्यापुरतं होतं. त्यांच्या वक्तव्याने आमदार फुटले नाहीत – राज ठाकरे
-
५. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावावर मला अजिबात पश्चाताप नाही. कारण शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि ते बाळासाहेबांचं अपत्य आहे. तो बाळासाहेबांचा निर्णय होता – राज ठाकरे
-
६. बाळासाहेबांच्या मनात काय चाललं होतं हे मला जाणवत होतं. राजकारणात अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पटत नाहीत किंवा पचत नाहीत. मात्र, तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेनेचा प्रमुख व्हावं, अध्यक्ष व्हावं असं वाटत नव्हतं – राज ठाकरे
-
७. “मी अनेकदा बाळासाहेबांना याबाबत पत्रंही लिहिली होती. मी त्या काळातही पक्षात माझी जबाबदारी काय ही एकच गोष्ट विचारत होतो – राज ठाकरे
-
८. मी शिवसेना सोडली तेव्हा पक्षात इतरांवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या जात होत्या आणि मला फक्त निवडणुकीत भाषणासाठी बाहेर काढलं जात होतं – राज ठाकरे
-
९. मी बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्वराला सांगितलं की, तुम्ही उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा, तो निर्णय मी जाहीर करेन. म्हणजे राज की उद्धव हा विषय बंद होईल. त्याप्रमाणे मी तो विषय बंद केला. त्यामुळे त्यावर पश्चाताप होण्याचा विषयच येत नाही – राज ठाकरे
-
१०. बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही. उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टी पैशात मोजायचे, पैशात तोलायचे. पक्षाकडे लक्ष द्यायचं नाही – राज ठाकरे
-
११. शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आत्ताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही – राज ठाकरे
-
१२. आजच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केलं असं काहीच नाही – राज ठाकरे
-
१३. उद्धव ठाकरेंची इतकी भाषणं ऐकलीत तर त्यात बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर काहीच नाही. त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावं – राज ठाकरे
-
१४. मला आत्ताची राजकीय स्थिती पाहून मला चुकीचा कॅरम फुटल्यावर जसं कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हे कळत नाही तसं वाटतंय. कोण कुठे आहे हेच कळत नाहीये. आत्ता लोकांना आपण मतदान कुणाला केलं होतं हेही कळत नसेल – राज ठाकरे
-
१५. महाराष्ट्रात काय चाललं आहे? आपण राजकीय दृष्ट्या असा महाराष्ट्र कधीच बघितला नाही. याचं कारण यांना लोकांच्या मतांची किंमत नाही – राज ठाकरे
-
१६. लोक बाळासाहेब होते म्हणून भावनेच्या आहारी जाऊन त्याच त्याच लोकांना मतदान करत बसतात. मात्र, बाळासाहेब कुठे आहेत? या भावनांना काय अर्थ आहे का? दिवसेंदिवस आपण महाराष्ट्र मागे नेत आहोत याचा साधा विचारही मनात येत नाही – राज ठाकरे
-
१७. पश्चिम बंगाल, तामिळनाडूत सर्वांनी पाहिलं की असं कुणी संपवायचं ठरवून कुणी संपत नाही. तुम्ही हाराकिरी केली तर त्याला परमेश्वरही वाचवू शकत नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला मी मोठा व्हावा असं वाटतं. यात काहीच चुकीचं नाही – राज ठाकरे
-
१८. मध्यंतरी एकजण पोरकटपणे बोललं की शरद पवारांनी सांगितलं म्हणून राज ठाकरेंनी पक्ष काढला. पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्यासमोर स्वतःचा राजकीय पक्ष काढणं सोपी गोष्ट होती का? आणि तेव्हा माझा आणि शरद पवारांचा काय संबंध होता? – राज ठाकरे
-
१९. आपल्याकडे कुठल्याही गोष्टी झाल्या की बहुदा भाजपाचा हात असावा, बहुदा पवारांचा हात असावा असं म्हणत त्यांचे हात चिकटवले जातात. हे काम त्यांचीच माणसं करतात आणि स्वतःचं महत्त्व वाढवून घेतात – राज ठाकरे
-
२०. भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी ऐकलेली गोष्ट केवळ उद्धृत केली होती. त्यावर सर्वांनी माफी मागायला सुरुवात केली. नंतर त्यांना पक्षातून काढलं. ओवैसी आमच्या देवदेवतांबद्दल जाहीर भाषणांमध्ये बोलतो त्यावेळी बाकीचे माफी मागतात का? – राज ठाकरे

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी