-
बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी त्यांनी कर्मच्या माध्यमातून आम्हाला जे दिलं आहे ते पाहता आमच्या त्यांच्यावर जास्त अधिकार आहे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
-
उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी बाळासाहेब हा एक विचार असल्याने त्यावर आमचाही अधिकार असल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
-
तसेच यावेळेस नांदगावकर यांनी शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल एक सूचक विधानही केलं आहे.
-
मुलाखतीमध्ये उद्धव यांनी बंडखोरांना बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही असंही म्हटलंय.
-
“बाळासाहेबांना त्यांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. नाही दिला तर लोक जोडे मारतील. कोणीही असला आणि तो बाळासाहेबांच्या विरोधात बोलला तर लोक त्याला जोड्याने हाणतील. म्हणून त्यांना बाळासाहेब पाहिजे पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं. माझं आव्हान आहे की ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवाच. मात्र ते करताना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागू नका,” असं उद्धव यांनी बंडखोरांना म्हटलंय.
-
“प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडीलांबद्दल आदर आहे तसा प्रत्येकाला असला पाहिजे. त्यांनी स्वत:च्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावी. आज माझ्या दुर्देवाने माझे आई-वडील माझ्यासोबत नाहीत पण ते नेहमी माझ्यामध्ये आहेत. पण ज्यांचे ज्यांचे आई-वडील सुदैवाने त्यांच्यामध्ये आहेत त्यांना मी म्हणेन की असा आशीर्वाद पुन्हा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?” असा प्रश्न उद्धव यांनी बंडखोर शिंदे गटाला केलाय.
-
“माझ्या वडिलांच्या फोटोचा, नावाचा आधार घ्यावा लागतो याचा अर्थ काय की तुमच्यात कर्तृत्व नाही. तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात. माझा तर विश्वासघात केला पण लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांच्या नावाने संभ्रम कशाला निर्माण करताय. तुमचा मर्दाचा चेहरा घ्या समोर आणि मागा मतं,” असंही उद्धव बंडखोरांबद्दल बोलताना म्हणालेत.
-
याचसंदर्भात नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांना बाळासाहेब हे एक व्यक्ती नसून विचार असल्याचं म्हटलं.
-
“बाळासाहेबांनी त्यांना जन्म दिला पण आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांना कर्म देऊन त्यांनी जन्म दिलेला आहे. ते त्यांचे वडील असले तरी त्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर,” असं राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते असणाऱ्या नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
-
बाळासाहेबांबद्दल बोलताना नांदगावकर यांनी, “कर्माने त्यांनी आम्हाला मोठं केलं आहे. बाळासाहेब हा एक विचार आणि संस्कार आहे. ते आम्हाला पुढे घेऊन जाणारं मार्गदर्शक नेतृत्व होतं. निश्चितपणे प्रत्येकाचा त्याच्या संस्थेवर अधिकार आहे पण विचारांवर आमचाही अधिकार आहे,” असं मत व्यक्त केलं.
-
“हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे मांडत असतानाच उद्धव ठाकरेही हिंदुत्वाची भूमिका मांडताना दिसतायत. त्याकडे कसं पाहता?” या प्रश्नावर, “प्रत्येकाला आपआपला पक्ष पुढे कसा घेऊन जायचा याचा अधिकार आहे. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यांनी त्यांची भूमिका घ्यावी,” असं नांदगावकर म्हणाले.
-
“शिंदे गटाचे एकनाथ शिंदे हे खरोखर हिंदुत्वाचा पुढे घेऊन जात आहेत का?” असा प्रश्न विचारण्यात आला असताना राज ठाकरेच हे बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचं नांदगावकर म्हणाले.
-
“राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. हे मी आज नाही तर वर्षानूवर्षे बोलत आलोय. पुढेही बोलत राहणार,” असं नांदगावकर म्हणाले.
-
तसेच, “यामागील कारण असं आहे की त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलेले आहेत. त्यांना त्यांची (बाळासाहेबांची) भावना आणि भूमिका पूर्णपणे ठाऊक आहेत,” असंही नांदगावकर म्हणाले.
-
“आता मागचं सरकार होतं त्यावेळी ते सरकार आम्ही तशी भूमिका घेऊन चालल्याचं दाखवत होते. पण लोकांना ते भावत नव्हतं. राज बोलतात ते लोकांना भावतं. आता जे सरकार आलंय ते बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाईल अशी अपेक्षा आम्ही धरुन चालेलो आहोत. कारण ते ही तसं बोलतायत. पहिल्या १५ दिवसांमध्ये नाही कळणार,” असंही नांदगावकर म्हणाले.
-
“राज ठाकरे नेहमीच अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या जे पोटात आहे तेच ओठात असतं. त्यामुळे ते आपली भूमिका ठामपणे मांडत असतात. त्यांनी मुलाखतीत तशीच भूमिका तशाच पद्धतीने मांडली अनेकांना ती भूमिका फार आवडल्याचं दिसत आहे,” असंही नांदगावकर म्हणाले.
-
“ही गोष्ट खरी आहे त्यांच्या स्पष्टवक्तेपणेमुळे लोकांना त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. त्यांनी दिलेलं भाषण, मुलाखत किंवा वक्तव्य असो किंवा त्यांनी लिहिलेलं पत्रं असो ते नेहमीच चर्चेत राहतं,” अस नांदगावकर म्हणाले.
-
“मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. तोच विचार आता राज ठाकरे महाराष्ट्राभरात नेत आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
-
“बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या विचारांचा मनसैनिक यांच्यात काहीही फरक दिसत नाही,” असंही नांदगावकर म्हणाले.
-
सध्या सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक असल्याचं सांगितलं जात असतानाच नांदगावकर यांनी केलेल्या या विधानामुळे मनसे आणि शिंदे गटाची जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जुलै रोजी भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.
-
त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने या भेटीचं कनेक्शन शिंदे गटातील त्या ४० आमदारांसंदर्भातील चर्चाशी जोडलं होतं.
-
शिवसेनेमध्ये बंड करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या ४० बंडखोर आमदारांचा मनसेमध्ये समावेश करुन घेण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली की काय अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केलेली.
-
“हे ४० आमदार मनसेमध्ये जातील का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव फडणवीस राज ठाकरेकडे घेऊन गेले का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो,” असंही तपासेंनी म्हटलं होतं.
-
“एकच आमदार असलेला पक्ष एका रात्रीत ४० आमदारांचा मालक होतो का अशा उलट सुलट चर्चा राज्यामध्ये सुरु झाल्यात. वास्तविक त्यांची काय चर्चा झाली माहिती नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यासाठी सक्षम आहे. शरद पवारांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वच जण पक्ष मजबूत करण्यासाठी काम करतोय,” असंही तापसे म्हणाले होते.
-
त्यामुळे आता उद्धव यांच्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दिलेली प्रतिक्रियेमुळे वेगवेगळ्या तर्कवितर्क मांडले जात आहेत.

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’