-
पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याला बुधवारी नवं वळण मिळालं जेव्हा सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २७ कोटी ९० लाख इतक्या रोख रक्कमेसहीत ३० कोटींहून अधिक संपत्ती ताब्यात घेतली.
-
बेलघराई येथील घरावर मारलेल्या छाप्यामध्ये ही संपत्ती ईडीच्या हाती लागली आहे. बुधवारी रात्री १० च्या सुमारास छापा अर्पिता यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकण्यात आला.
-
यापैकी एका फ्लॅटमध्ये पैसे आणि सोनं आढळून आलं. अर्पिता यांच्या या दुसऱ्या घरावर छापा टाकण्यात आल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत नोटांची मोजणी सुरु होती.
-
एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम किती आहे याचा पंचनामा करण्यासाठी चार नोटा मोजण्याच्या मशिन्स मागवल्या.
-
कोलकात्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयामधून या मशिन्स मागवण्यात आल्या होत्या. म्हणजेच चार तासांहून अधिक वेळ या नोटांची मोजणी करण्याचं काम सुरु होतं.
-
एकीकडे नोटांची मोजणी सुरु झाली तर दुसरीकडे ईडीने ट्रक आणि पेट्यांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास हे सामान घेऊन जाण्यासाठी एक ट्रक अर्पिता यांचे फ्लॅट्स असणाऱ्या इमारतीखाली दाखल झाला.
-
या छापेमारीनंतर तृणमूलचे मंत्री पार्थ चॅटर्जी मुख्य आरोपी असणारं हे प्रकरण जुनं असलं तरी ज्या पद्धतीने तपासाला वेग आला आहे ते पाहता यामधून कोणीही वाचू शकणार नाही असं भाजपाच्या दिलिप घोष यांनी म्हटलंय.
-
“पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीचा तपास मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. पार्थ हे सहजासहजी बोलणार नाहीत. पण अर्पिता यांनी माहिती देण्यास सुरुवात केलीय आणि आम्ही हे सारं ऐकतोय,” असं घोष यांनी म्हटलंय.
-
बेलघराईमधील फ्लॅटमध्ये सापडलेली रोकड ही २७ कोटी ९० लाख इतकी म्हणजेच जवळजवळ २८ कोटींच्या आसपास आहे. ईडीनेच ही आकडेवारी दिली आहे.
-
एकीकडे या फ्लॅटमध्ये जवळजवळ २८ कोटी रोख सापडले असतानाच दुसरीकडे इमारतीच्या नोटीस बोर्डवर मेन्टेन्स न भरलेल्यांच्या यादीमध्ये अर्पिता मुखर्जी यांचं नाव असून त्यांच्या या फ्लॅटचा ११ हजार ८१९ रुपये मेन्टेन्सची थकबाकी असल्याचं नोटीस बोर्डवर दिसत आहे.
-
ईडीच्या या दुसऱ्या छाप्यामध्ये ४ कोटी ३१ लाखांचं सोनंही सापडलं आहे.
-
अर्पिता मुखर्जी यांच्या डायमंड सिटी कॉम्पलेक्स येथील घरावर शुक्रवारी ईडीने धाड टाकली तेव्हा तिथेही २० कोटींची रोख रक्कम सापडली होती.
-
आर्पिता यांच्या घरी सापडलेल्या दोन हजार आणि ५०० रुपयाच्या नोटांचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता.
-
बेलघराई येथील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यातील ही मोठ्या प्रमाणातील रोख घेऊन जाण्यासाठी ईडीने दहा मोठ्या आकाराच्या पत्र्याच्या पेट्या मागवल्या.
-
या पेट्यांमधून ही २७ कोटी ९० लाखांची रक्कम घेऊन ईडीच्या कार्यालयात नेण्यात आली. २००० आणि ५०० च्या नोटा या पेट्यांमध्ये भरुन नेण्यात आल्या.
-
रात्री दहा वाजता सुरु झालेली ही छापेमारी सकाळी सव्वा सातच्या सुमारात या पेट्या ट्रकमध्ये चढवल्यानंतर संपली. आधीचा आणि हा छापा मिळून अर्पिता यांच्या घरी ४७ कोटींहून अधिक रोख रक्कम सापडलीय.
-
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अर्पिता मुखर्जी यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये, “पार्थ चॅटर्जी माझ्या घराचा वापर मिनी बँक प्रमाणे करत होते” असं म्हटलंय.
-
अटकेत असणारे मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी राजीनाम्यासंदर्भातील मागणीवर प्रतिप्रश्न करताना “राजीनामा देण्याचं कारण काय?” असं विचारलंय.
-
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिता मुखर्जी या तपासामध्ये सहकार्य करत आहेत. मात्र त्याचवेळी पार्थ चॅटर्जी हे अनेक प्रश्नांना उत्तरं देण्यात टाळाटाळ करतना दिसत आहेत.
-
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते कुणाल घोष यांनी अर्पित यांच्या घरामध्ये सापडलेली रक्कम आणि संपूर्ण घटनाक्रम हा पक्षाच्या नावाला गालबोट लावणारा असल्याचं म्हटलंय.
-
“ते राजीनामा का देऊ असं विचारत आहेत. त्याऐवजी ते लोकांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचं का सांगत नाहीत? हे करण्यापासून त्यांना कोण थांबवत आहे?” असा प्रश्न घोष यांनी विचारलाय.
-
तृणमूलचं मुखपत्र असणाऱ्या ‘जागो बांगला’ या वृत्तपत्रामध्ये पार्थ चॅटर्जी यांचा मंत्री किंवा पक्षाचे सचीव असा उल्लेख करणं बंद केलं आहे. पार्थ आणि अर्पिता हे निटवर्तीय असल्याने अर्पिताच्या माध्यमातून पार्थ हेच पैशांचे व्यवहार करत असल्याची शंका ईडीला आहे.
-
‘जागो बांगला’मध्ये प्रकाशित झालेल्या तृणमूलच्या वक्तव्यामध्ये कुणाल घोष यांनी ईडीच्या या कारवाईचा संबंध राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणारे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी जोडला आहे.
-
“आम्ही राजभवानामध्ये सुवेंद्र अधिकारी यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेले होतो त्यावेळी धनकड यांनी मी पार्थ चॅटर्जीला सोडणार नाही असं म्हटलं. माझ्या पत्नीला त्यांनी अपमानित केल्याचं धनकड म्हणाले,” असा दावा कुणाल यांनी केलाय.
-
“आम्ही त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की यासंदर्भात तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले,” असं कुणाल घोष म्हणाले. धनखड यांच्या पत्नी सुदेश या अनेक कार्यक्रमांना त्यांच्यासोबत उपस्थित असण्यावर पार्थ चॅटर्जी यांनी मागील वर्षी एका ठिकाणी बोलताना आक्षेप घेता होता.
-
या प्रकरणामध्ये जो दोषी आढळेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मांडली.
-
मात्र प्रसारमाध्यमाकडून होणाऱ्या ‘मिडीया ट्रायर्स’ योग्य नसल्याचंही ममता म्हणाल्या. तपास यंत्रणांचा वापर राजकीय पक्षांना बदनाम करण्यासाठी केला जाऊ नये असंही ममता यांनी म्हटलंय.

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण