-
काँग्रसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाने आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर माफ मागावी अशी मागणी केली. अधिर रंजन चौधरी यांनी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. नेमकं काय घडलं आणि कोण काय म्हणालं जाणून घेऊयात महत्वाच्या मुद्द्यांच्याआधारे…
-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया यांधींवर टीका करताना त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली. “देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करण्याची परवागनी सोनिया गांधींनी दिली,” असा आरोप इराणी यांनी लोकसभेमध्ये बोलताना केला. तसेच त्यांनी सोनिया गांधी या “आदिवासीविरोधी, दलितविरोधी आणि महिलाविरोधी” असल्याचा आरोप केला.
-
त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही या विषयावर आक्षेप घेतला. करोनावर मात करुन सभागृहाच्या कारभारामध्ये प्रत्यक्षात सहभागी झालेल्या निर्मला यांनी हे वक्तव्य महिलांचं अपमान करणारं असल्याचं म्हटलं. जाणून बुजून हे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप निर्मला यांनी केला. तसेच पक्षाच्यावतीने सोनिया गांधींनी माफी मागावी असंही निर्मला यांनी म्हटलं.
-
“स्वत: एक महिला असूनही आपल्या नेत्याला अशाप्रकारे बोलण्याची परवानगी देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी माफी मागावी अशी मी मागणी करते. सोनिया गांधींनी देशासमोर येऊन देशाच्या राष्ट्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागावी,” असं निर्मला यांनी म्हटलंय.
-
अधिर रंजन चौधरी यांनी या प्रकरणात माफी मागितली असून आपली जीभ घसरल्याने चूकून आपण तो शब्द वापरल्याचं म्हटलंय. “भाजपा राईचा पर्वत करत आहे,” अशी टीकाही चौधरी यांनी केली.
-
जीएसटी, अग्निपथ योजना, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा हे करत असल्याचा आरोप चौधरी यांनी केलाय.
-
“भारताच्या सर्वोच्च पदावर कोणीही असो अगदी तो ब्राह्मण असो किंवा आदिवासी असो ते आमच्यासाठी राष्ट्रपतीच आहेत. आमचा सन्मान हा त्या पदासाठी आहे. काल आम्ही विजय चौकामध्ये आंदोलन करत असताना पत्रकाराने आम्हाला कुठे जायचं आहे. त्यावर मी त्यांना आम्ही राष्ट्रपतीभवनाकडे जातोय असं सांगितलं. त्याचवेळी मी एकदा चुकून “राष्ट्रपती” म्हणाले. पत्रकाराने मला ते सांगितलं. त्यावर मी ते चुकून म्हटलं असून तुम्ही ते प्रदर्शित न केल्यास बरं होईल असंही म्हटलं. यावरुन त्यांनी (भाजपाने) गोंधळ सुरु केलाय. मी केवळ एक शब्द बोलताना चूक केली,” असं चौधरी यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खुलासा करताना म्हटलंय.
-
या प्रकरणासंदर्भात एनडीटीव्हीशी बोलताना सोनिया गांधी यांनी “घडलेल्या गोष्टीबद्दल अधिर रंजन चौधरींनी माफी मागितली आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवलीय.
-
अधिर रंजन चौधरी हे लोकसभेमधील काँग्रेसचे नेते आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता. वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलेलं. त्यावरुन लोकसभेत हा गदारोळ झाला.
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीएने) मुर्मू यांचं नावाची घोषणा केल्यापासूनच द्वेषपूर्ण भाषेमध्ये काँग्रेस मुर्मू यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणी यांनी केलाय.
-
इराणी यांनी मुर्म यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ‘बोलकी बाहुली’ आणि ‘वाईटाचं प्रतिक’ असंही म्हटल्याचा आरोप केलाय.
-
“भारताच्या राष्ट्रपतींचा अशा प्रकारे उल्लेख करणे हे केवळ त्यांच्या घटनात्मक पदालाच नाही तर त्या ज्या समृद्ध आदिवासी वारशाचे प्रतिनिधित्व करत आहे त्यालाही अपमानित करण्यासारखं असल्याची जाणीव काँँग्रेस नेत्यांना आहे,” असंही इराणी म्हणाल्या.
-
भाजपाने या विषयावरुन घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं.
-
भाजपाच्या महिला खासदारांनी अधिर रंजन यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनही केलं.
-
आम्ही महिलांचा असा अपमान सहन करणार नाही. आदिवासी महिला राष्ट्रपती असल्याने त्यांना लाज वाटत असेल तर यासारखं निंदनीय दुसरं काही नाही, असं मत भाजपा खासदार रमा देवी यांनी नोंदवलं.
-
गोंधळ सुरु असताना सोनिया गांधी भाजपा नेत्या रमादेवी यांच्याजवळ गेल्या आणि अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली असल्याचं सांगितलं. “माझं नाव का घेतलं जात आहे?”, अशी विचारणाही त्यांनी केली. सोनिया गांधी आणि रमादेवी यांच्यात संभाषण सुरु असताना स्मृती इराणी यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी नाही तर आपण नाव घेतलं असल्याचं म्हटलं. यावर सोनिया गांधी यांनी त्यांना ‘माझ्याशी बोलू नका’ असं सुनावलं. यानतंर दोघींमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. तब्बल दोन ते तीन मिनिटं हा वाद सुरु होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, भाजपाचे प्रल्हाद जोशी आणि अर्जुन मेघवाल यांनी मध्यस्थी केली.
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य