-
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन्स कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
-
मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.
-
ईडी, संजय राऊत आणि सपना पाटकर यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राऊत यांची कोठडी वाढवण्याचा निर्णय दिला.
-
या सुनावणीदरम्यान राऊत यांचे वकील मनोज मोहिते आणि ईडीच्या वकिलांबरोबरच सपना यांचे वकील रणजित सांगळे यांनी नेमका काय युक्तिवाद केला? नेमके काय दावे प्रतिदावे कऱण्यात आले? न्यायालयामध्ये आणि न्यायालयाबाहेर काय घडलं यावर या गॅलरीच्या माध्यमातून नजर टाकूयात…
-
पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे.
-
त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती.
-
लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे, असं ईडीने न्यायालयाला सांगितलं. यामध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांचीही चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भातील समन्सही राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना पाठवण्यात आलेत.
-
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासामध्ये संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले.
-
या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे.
-
संजय राऊतांविरोधात महत्वाची कागदपत्रं मिळाली आहेत, असा दावा ईडीने आज न्यायालयासमोर बाजू मांडताना केला.
-
त्याचप्रमाणे प्रविण राऊत यांनी संजय राऊतांच्या खात्यावर १ कोटी ६ लाख रुपये जमा केल्याचा दावाही ईडीने केलाय.
-
प्रविण राऊतांकडून मिळालेल्या याच पैशांमधून राऊत यांनी अलिबागची जमीन खरेदी केल्याचंही ईडीने न्यायालयात सांगितलं.
-
संजय राऊतांच्या परदेश दौऱ्याचा तपशीलही तपासत आहोत असंही ईडीने न्यायालया सांगितलं आहे.
-
संजय राऊत कुटुंबीयांच्या देश-विदेशातील दौऱ्याचा (प्रवासाचा) खर्च प्रवीण राऊतने केल्याचा आरोप आहे.
-
प्रकल्पाच्या काळात प्रवीण राऊत याने संजय राऊत यांना दर महिन्याला दोन लाख रुपये रोख दिल्याचाही आरोप आहे.
-
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांची खाती देखील तपासत असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं आहे.
-
आपली बाजू मांडताना ईडीने वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही संशयास्पद व्यवहार झाल्याचंही नमूद केलं आहे.
-
१ कोटी ६ लाख आणि १ कोटी ८ लाख रुपये वर्षा राऊतांनी अनोळखी व्यक्तीला पाठवल्याचं तपासात दिसून आलं असल्याचं ईडीने म्हटलंय.
-
संजय राऊत आणि वर्षा राऊतांच्या खात्यावरील मोठ्या व्यवहारांची पडताळणी करायची आहे, असंही ईडीने न्यायालया सांगितलं.
-
राऊतांवर झालेले आरोप हे नवीन नाहीत, या प्रकरणामध्ये आधी चौकशी झाली आहे असं राऊत यांच्या वकीलांनी युक्तिवाद करताना न्यायालया सांगत कोठडी वाढवण्याची गरज नसल्याचं म्हटलं.
-
संजय राऊतांना जबाब नोंदवण्यासाठी धमकावलं जातंय असंही राऊत यांच्या वकिलांनी न्यायालया सांगितलं.
-
वर्षा राऊतांकडील व्यवहारांची पूर्ण माहिती ईडीकडे आहे, असा दावाही संजय राऊतांच्या वकिलाने युक्तीवादामध्ये केला.
-
सपना पाटकर यांचे वकील रणजित सांगळे यांनी संजय राऊतांकडून सपना पाटकर यांना धमकावलं जात असल्याचा आरोप करण्यात आला.
-
यावर न्यायालयाने राऊत कोठडीमध्ये असताना हे कसं शक्य आहे असा प्रश्न पाटकर यांच्या वकिलांना विचारला.
-
यावर न्यायालयाने तुमचं जे काही म्हणणं असेल ते कायदेशीररित्या ईडीकडे मांडावं असं सपना पाटकर यांना सांगितलं.
-
न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीमध्ये वाढ केल्याने आता राऊत यांचा मुक्काम बेलार्ड पिअर येथील कार्यालयामध्ये असणार आहे.
-
ईडीच्या बेलार्ड पिअरमधील कार्यालयामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ती जागा फार घुसमट होणार असल्याची तक्रार राऊत यांनी न्यायालयाकडे केली.
-
यानंतर न्यायालयाने यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांना या तक्रारीची दखल घेण्यास सांगून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं.
-
न्यायालयाने राऊत यांना घरचा डबा आणि औषधं दिली पुरवण्यासंदर्भातील मूभा दिली आहे. डब्बा आणि औषधांसहीत एकूण तीन सवलती न्यायालयाने राऊत यांना दिल्यात.
-
त्याचप्रमाणे ईडीच्या कोठडीत असताना राऊत यांना रोज सकाळी साडेआठ ते साडेनऊ दरम्यान त्यांच्या वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ देण्यात यावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
-
रात्री दहा वाजल्यानंतर राऊत यांची चौकशी केली जाऊ नये असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
-
आज न्यायालयाबाहेर राऊत यांची सुरक्षारक्षकासोबत बाचाबाचीही झाल्याचं चित्र पहायला मिळालं.
-
राऊत हे गाडीमध्ये बसण्याआधी समर्थकांना हात उंचवाून दाखवत होते.
-
मात्र त्यावेळी एका सुरक्षारक्षकाने राऊत यांना हात लावून गाडीत बसण्यास सांगितलं असता राऊत चिडले आणि त्यांचा सुरक्षारक्षकासोबत वाद झाला. राऊत अगदी हातवारे करुन चिडून त्या सुरक्षारक्षकाला काहीतरी बोलल्याचं कॅमेरात कैद झालं.
-
आता पुढील चार दिवस राऊत यांची ईडीकडून चौकशी केली जाणार असून त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचीही चौकशी होणार आहे.
-
राऊत यांच्याशी संबंधित पाच जणांची चौकशी आम्ही करणार असल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं असून या दाव्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती समोर आलीय.


