-
राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु असून खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. बंडखोरीच्या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, आता आणखी एक ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. तेजस ठाकरे लवकरच सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता असून त्यांच्याकडे मोठी जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता आहे.
-
‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही मागणी करत आपली इच्छा व्यक्त केली आहे. यावर शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली आहे.
-
सोशल मीडियावर शिवसेनेच्या समर्थकांकडून अशा काही प्रतिक्रिया उमटत आहेत
-
तेजस ठाकरेंना लवकरच राजकारणात आणावं अशी मागणी होत आहे
-
तेजस ठाकरे यांना राजकीय वारसा असला तरी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे निसर्गात रमणारे, खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावणारे तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश कऱणार का? याची उत्सुकता आहे.
-
तेजस ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र आहेत.
-
तेजस ठाकरे राजकारणापासून दूर असले तरी अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये ते दिसत असतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री मुंबईत आले होते, तेव्हाही उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरे त्यांच्या स्वागताला, बैठकीला उपस्थित होते.
-
७ ऑगस्टला सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरात आल्यानंतरही तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती.
-
याशिवाय २०१९ विधानसभा निवडणुकीत भाऊ आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाता प्रचारासाठी ते उतरले होते.
-
दरम्यान तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश कऱणार का? यासंबंधी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
-
“तेजस ठाकरे एक युवा नेतृत्व आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी उपस्थिती लावली आहे. विधानसभा निवडणुकीतही ते सक्रीय होते. त्यांना राजकारणात रस आहे, पण ते पर्यावरण प्रेमीदेखील आहेत,” असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं आहे.
-
“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पर्यावरणप्रेमी असून हे कोरडं प्रेम नाही. अमूलाग्र बदल घडवावा अशी त्यांची इच्छा आहे. तेजस ठाकरेंनी खेकड्यांच्या विविध प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांच्याबद्दल तरुणांमध्ये आकर्षण नक्कीच आहे,” असंही त्यांनी म्हटलं.
-
“काही स्वार्थी लोक शिवसेना सोडून गेले असताना शिवसैनिकांचं ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम आणि निष्ठा दिसत आहे. अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे जर युवा वर्गाला तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं असं वाटत असेल तर आम्ही स्वागतच करतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
-
-

१२ मार्च राशिभविष्य: मघा नक्षत्राबरोबर जुळून आलाय सुकर्म योग! १२ पैकी कोणत्या राशीला होणार फायदा आणि तोटा?