-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला.
-
मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती.
-
पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला.
-
या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते.
-
त्यामुळे राठोड मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
-
पूजा चव्हाण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना कठोर प्रश्न विचारत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
-
सर्व पुरावे असतानाही काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप फडणवीसांनी १ मार्च २०२१ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.
-
“पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे,” असं फडणवीस म्हणाले होते.
-
२०२१ च्या याच प्रतिक्रियेमध्ये फडणवीस यांनी, “सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता,” असंही म्हटलं होतं.
-
“मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं?,” असा प्रश्न फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला होता.
-
“एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस राठोड प्रकरणावरुन म्हणाले होते.
-
चित्रा वाघ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी तत्कालीने ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं.
-
संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
-
“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
-
तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
-
चित्रा वाघ यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.
-
मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवरुन संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांची नावं मंत्रिमंडळात पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं.
-
“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड? अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात? अब्दुल सत्तार? यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का? घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. एका माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
या ट्विटनंतर काही तासांनी दमानिया यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लत्ना शिंदे आणि फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा उल्लेख करत राठोड यांच्या मंत्रीपदावरुन ट्विट केलं.
-
“संजय राठोड यांना मंत्री बनवलं यावर मीडियाने सौ. लता एकनाथ शिंदे व अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. खरं तर अशी किळसवाणी लोकं राजकारणात राहूच दिली नाही पाहिजे. सगळ्या स्त्रियांनी मिळून याचा तीव्र निषेध करायला हवा,” असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.
-
अन्य एका ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील एका प्रसंगावरुन टोला लगावला आहे.
-
“मुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य न तुम्ही? त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलं ते फक्त पिक्चर पूर्त होतं का?” असा प्रश्न अंजली दमानियांनी उपस्थित केलाय.
-
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटामधील कथानकामध्ये बलत्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या एका तरुणीने आई-वडील आनंद दिघेंकडे न्याय मागण्यासाठी येतात.
-
त्यावेळी बलात्काराची सगळी घटना ऐकून आनंद दिघेंसोबत काम करणारे एकनाथ शिंदे संतापून या बलात्काऱ्याला धडा शिकवण्यासाठी हॉकी स्टीक घेऊन धावून जाताना दाखवण्यात आलेत.
-
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटामधील याच प्रसंगावरुन दमानिया यांनी राठोड यांना मंत्रीपद देण्यात आल्यानंतर लगावला आहे.
-
आता त्याच साऱ्या गोंधळावरुन राठोड यांना शिंदेंनी मंत्रिमंडळात घेतल्याने विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टकरण देत आपली भूमिका मांडली.
-
एकनाथ शिंदे यांना राठोड यांना संधी देण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
-
“महाविकासआघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती,” असं शिंदेंनी म्हटलं आहे.
-
तसेच, “यानंतरही कुणाचे काही विचार असेल, म्हणणं असेल तर नक्की सांगा, ते ऐकून घेतलं जाईल. लोकशाहीत प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे,” असं शिंदेंनी म्हटलंय.
-
“सर्वांना माहिती आहे की, पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. त्या तपासात काहीच निष्पन्न झालं नाही,” असं शिंदे यांनी राठोड यांच्यासंदर्भातील प्रकरणाबद्दल म्हटलंय.
-
“त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली. म्हणून राठोडांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
-
सध्या या विषयावर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी याच मुद्द्यावरुन विरोधक भविष्यामध्येही शिंदे सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
