-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महिनाभरानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला.
-
मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती.
-
या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं. भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते.
-
त्यामुळे राठोड मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
-
संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
-
तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
-
चित्रा वाघ यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.
-
या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता मयत पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
-
शांताबाई यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
-
“आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही,” असं शांताबाई म्हणाल्या आहेत.
-
ज्या पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं आहे हे दुर्दैवी बाब आहे, असंही पूजा चव्हाणच्या आजीने म्हटलंय.
-
“त्याला मंत्रिमंडळात स्थान देणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे,” असं शांताबाई यांनी म्हटलं आहे.
-
“खरं तर एका मुलीची आब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढं ऐकून सुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो,” असं म्हणत शांताबाई यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर व्हायरल झालेल्या संवादाच्या ऑडिओ क्लिप्सचा संदर्भही दिलाय.
-
“आरती करावी त्याची या (शिंदे-फडणवीस) सरकारने,” असा टोलाही शांताबाई यांनी लगावला आहे.
-
“त्याची पूजा करा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल,” असा टोलाही शांताबाई यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
-
“हा (राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय) महिलांचा अपमानच आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
-
“पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही,” असं शांताबाई राठोड यांच्यावर संताप व्यक्त करताना म्हणाल्या आहेत.
-
“संजय राठोड गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार,” असंही शांताबाई यांनी म्हटलं आहे.
-
“तो खुनी आहे खुनीच राहणार,” अशी टीकाही पूजा चव्हाणच्या आजीने केली आहे.
-
तुमची सरकारकडे मागणी काय आहे? तुम्ही काय करणार आहात? असे प्रश्न पत्रकारांनी पूजाच्या आजीला विचारले.
-
शांताबाई यांनी, “पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील,” असं उत्तर या प्रश्नाला दिलं.


