-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत संजय राऊत आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
-
शिंदे यांनी ठाण्यातील जाहीर कार्यक्रमात दिलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटासहीतच पूर्वीच्या सरकारमधील मित्र पक्षांवरही टीका केली आहे.
-
ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांनी एकत्रित येऊन शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.
-
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी मुलाखत घेतली.
-
या मुलाखतीमधील राजकीय घडामोडींसदर्भातील प्रश्नांना शिंदे यांनी उघडपणे दिलेली उत्तरे चांगलीच चर्चेत आहेत.
-
आगामी सर्व निवडणूका भाजपा-शिवसेना युतीत लढविणार असून त्याचबरोबर लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
-
या सत्कार सोहळ्याआधी ठाण्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये शिंदेंचा सत्कार झाला.
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेटीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नाबद्दलही सांगितलं.
-
“आम्ही बिहारमध्ये नितीश कुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवले आणि तुमचे ५० आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्री बनवले. मग आम्ही त्यावेळी शिवसेनेला शब्द दिला असता तर, तो फिरवला असता का? असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले,” असं शिंदेंनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं.
-
“मुंबई राज्यापासून कोणीच वेगळी करु शकत नाही. पण, त्याचा काही जण राजकीय फायदा घेत आहेत,” असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर टीका केली.
-
“राम मंदिर उभारणे आणि ३७० कलम हटविणे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. दोन्ही कामे झाली आहेत,” असंही शिंदे म्हणाले.
-
“३७० कलम रद्द झाले पण, माविआमध्ये होतो त्यामुळे त्याचा आम्ही आनंदही साजरा करु शकलो नाही,” असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
-
“सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे नाही का? जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे का?” असा प्रश्नही शिंदेंनी उपस्थित केला.
-
“पातळी सोडून बोलण्याचा आणि दुसऱ्यांवर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही.”, असेही शिंदे यांनी मुलाखतीमध्ये म्हटले.
-
“आम्ही राज्यसभा आणि विधान परीषदेला प्रामाणिकपणे मतदान केले. पण समोरच्यांनी नाही केले आणि चुकीचा माणूस पडला,” असे सांगत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
-
“आजचा झालेला सत्कार मी बाळासाहेब आणि आनंद दिघे यांना समर्पित करतो. आम्ही जे काही पाऊल उचलले आहे. त्याला नागरिकांनी केलले स्वागत हेच उत्तर आहे,” असंही शिंदे म्हणाले.
-
“आम्ही जो मार्ग आम्ही पत्कारलेला आहे, तो बाळासाहेबांच्या भूमिकेचा मार्ग आहे,” असं शिंदे यांनी पुन्हा एकदा सांगितलं.
-
“बाळासाहेबांची अनेक भाषणे आहेत. त्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांसोबत कधी जायची वेळ आली तर दुकान बंद करेन, असे म्हटले होते. आम्ही त्यांचे विचार पुढे नेतोय, मग आम्ही काय चुकीचे केले?”, असेही त्यांनी म्हटले.
-
“अन्याय होईल तिथे आवाज उठवा लढा अशी शिकवण बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची होती. मी मुख्यमंत्री पदासाठी हे पाऊल उचलल नाही,” असंही शिंदे म्हणाले.
-
“मला आजही मी मुख्यमंत्री आहे असे वाटत नाही. मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. समाजातील प्रत्येक घटक सुखी राहवा हीच इच्छा आहे”, असेही ते म्हणाले.
-
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत अद्यापही सत्तेत राहिलो असतो, तर शिवसेना पक्षाचे काय झाले असते, हे ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही,” असा टोलाही शिंदेंनी लगावला.
-
“आता घेतलेली भूमिका आम्ही अडीच वर्षांपूर्वीच घेतली पाहिजे होती, आम्ही विश्वासघात केला नाही.”, असेही विधान त्यांनी केले.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य