-
उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पावसामुळे झालेलं शेतकऱ्याचं नुकसान ते शिंदे गटातील आमदारांनी दिल्या जाणाऱ्या धमक्या या सगळ्याचा त्यांनी समाचार घेतला. जाणून घेऊयात अजित पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले…
-
अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं.
-
अजित पवारांनी संतोष बांगर आणि प्रकाश सुर्वे प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केलं. संतोष बांगर यांनी सोमवारी हिंगोलीतील एका मध्यान्न भोजन केंद्रावरील निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित करत संबंधित केंद्राच्या व्यवस्थापकालाच कानशिलात लगावली. तसेच, “मला टीकेची पर्वा नाही, लोकांसाठी कायदा हातात घ्यायला मी तयार आहे”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर “सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी राज्य सरकारचे कान टोचले.
-
तसंच प्रकाश सुर्वे यांनी हात, पाय तोडण्याची भाषा केल्याने हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना पटतं का? असा प्रश्न्ही त्यांनी विचारला.
-
“सरकार येऊन काही दिवस झालेले असताना यांच्यातील काही आमदारांकडून संघर्ष पेटावा अशी भाषा वापरली जात आहे. शिवसैनिकांना ठोकून काढा, हात तोडा, तंगडी तोडा…ही काय पद्धत…यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली शिकवण सोडून शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तोडा, मारा अशी भाषा वापरत आहेत. हे एकनाथ शिंदे. देवेंद्र फडणवीस, भाजपा यांना पटतं?,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.
-
“शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं. याचा अर्थ तुम्ही कायदा हातात घेत आहात. तुम्ही स्वत:ला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली आहे का?,” अशी विचारणा अजित पवारांनी यावेळी केली.
-
“कोणीही असलं तरी सर्वांसाठी कायदा, संविधान समान आहे. कायदा, संविधानापेक्षा कोणी मोठं नाही, सरकरामध्ये असो किंवा नसो,” असे खडे बोल त्यांनी सुनावले.
-
“अजून सुरुवात झालेली नाही आणि यांना इतकी मस्ती आली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही? संबंधितांचं यांना समजावून सांगण्याचं काम नाही का ? महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे,” अशी टीकाही अजित पवारांनी केली.
-
“देशात अमृत महोत्सव साजरा होत असताना एक आमदार अशा प्रकारची भाषा वापरतो. जर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही असं वागणार असाल तर चांद्यापासून बांद्यापर्यंत काय करत असाल?,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.
-
“अशाप्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देऊ नये. याचंही उत्तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलं पाहिजे,” अशी मागणीही अजित पवारांनी केली.
-
यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “शेतीच्या नुकसानाचे पंचनामे अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी एवढी वाट पाहावी लागत आहे का?” असा प्रश्न एका पत्रकाराने उपस्थित करताच अजित पवारांनी त्यावर टोला लगावला.
-
“तुम्हाला कुणी सांगितलं विरोधी पक्ष कमकुवत आहे? त्यांच्यावर प्रभाव पाडायला आम्ही आता काय केलं पाहिजे? त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का काय? अवघडच काम आहे. आम्ही सगळे बसलोय. भूमिका मांडतोय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय. त्यांना निवेदन दिलंय. धन्य आहे सगळ”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”