-
राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नसताना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीवर पडणारा बोजा, आमदारांना खूश करण्यासाठी होणारी निधीची खैरात, या पार्श्वभूमीवर सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु झाले.
-
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून ते मुख्यमंत्रीपदी आहेत.
-
अशा वेळी विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेलाच कसे देता येईल, असा कायदेशीर व तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.
-
भाजपा आणि शिंदे गटाकडून दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.
-
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त असून त्या जागी कोणाची निवड करायची, याबाबत भाजपामध्ये विचारविनिमय सुरू आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे.
-
विधान परिषदेतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींचा समावेश आहे.
-
बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे.
-
दरेकर हे फडणवीस यांच्या विश्वासातील असून त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आलेला नाही.
-
त्यामुळे राम शिंदे किंवा प्रवीण दरेकर यांच्यापैकी एकाची विधान परिषद सभापतीपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
-
राज्यपाल नियुक्त १२ जागांवर नियुक्ती झाल्याशिवाय सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार नाही.
-
कारण १२ सदस्यांची भर पडली तरच भाजपाला सभापतीपद मिळू शकते.
-
विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य असले तरी त्यापैकी तीन-चार सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
-
उपसभापतींनी विरोधी पक्षनेतेपदी दानवे यांची नियुक्ती केली असली तरी त्याची घोषणा सभागृहात होते.
-
मात्र यामध्ये काँग्रेसही शिंदे सरकारविरोधात विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-
काही आमदार शिंदे गटाकडे गेल्यावर शिवसेनेची सदस्यसंख्या कमी झाल्यास फायदा काँग्रेसला होऊ शकतो.
-
अशा परिस्थितीत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला जाऊ शकतो.
![maharashtra assembly monsoon session 2022 shivsena vs shinde group over leadership in house](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/08/Danve-1.jpg)