-
कर्नाटकचे कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांची एक ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
-
‘‘कर्नाटक सरकार काम करत नसून कशी तरी परिस्थिती हाताळत आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजप फक्त काही गोष्टी सांभाळत आहे,’’ असे विधान मधुस्वामी यांनी या ध्वनिफितीत केले आहे.
-
कायदामंत्र्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी सरकारमध्ये कोणताही वाद नसून सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले.
-
कायदामंत्री मधुस्वामी आणि चन्नापाटन येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले. या संभाषणाची ही ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली.
-
कर्नाटकातील व्हीएसएसएन बँकेच्या विरोधात शेतकरी संतप्त असून त्यासंबंधीची तक्रार भास्कर यांनी मधुस्वामी यांच्याकडे केली.
-
त्यावर मधुस्वामी म्हणाले, ‘‘आम्ही इथले सरकार चालवत नाही. आम्ही केवळ पुढील सात ते आठ महिने कसे तरी राज्य हाताळत आहोत.’’
-
व्हीएसएसएन बँकेचे अधिकारी ५० हजारांच्या कर्जमंजुरीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त १३०० रुपये मागत असल्याची तक्रार भास्कर यांनी करताच मधुस्वामी यांनी आपल्या सहकारी मंत्र्यावर खापर फोडलं.
-
मधुस्वामी यांनी भास्कर यांना सांगितले की, ‘‘मला हा विषय माहीत आहे. मी सरकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांना याबाबत कळवले आहे. मात्र ते दुर्लक्ष करत असून कोणतीही कारवाई करत नाही. काय करावे?’’
-
कायदामंत्र्यांच्या या ध्वनिफितीमुळे कर्नाटक सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. सहकारमंत्री सोमशेखर यांनी मधुस्वामी यांच्यावर टीका केली.
-
‘‘मधुस्वामी हे स्वत: सरकारचा भाग असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेही सहभागी होतात. जबाबदार पदावर असताना अशी वक्तव्ये करणे अयोग्य आहे,’’ असे सोमशेखर म्हणाले.
-
“मधुस्वामी यांचे वक्तव्य वेगळ्या संदर्भात आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली आहे, त्यामुळे गैरसमज करून घेण्याची गरज नाही,” असंही मुख्यमंत्री बसवराज यांनी स्पष्ट केलं आहे.
-
“तीन महिन्यांपूर्वी त्यांनी सहकार खात्यातील काही गोष्टींबाबत भाष्य केले होते. ही टिप्पणी फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे सर्व काही ठीक आहे,’’ असंही बसवराज यांनी सांगितलं.
