-
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पालघर आणि हत्तीरोगाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळालं. आरोग्यमंत्र्यांनी योग्य उत्तर न दिल्याने आणि प्रश्न राखीव ठेवण्यात येत नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांनी संताप व्यक्त केला. जाणून घ्या नेमकं काय झालं….
-
कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार यांच्याह विरोधी पक्षातील काही आमदारांनी पालघरमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने चिंता व्यक्त करत प्रश्न विचारले.
-
शिंदे सरकारवर उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की ओढवली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारला होता. पण याची उत्तरं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. सोमवारी या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे.
-
पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी असे प्रश्न यावेळी विचारण्यात आले.
-
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी आपल्याच काळात काही पदं भरली गेली आहेत अशी माहिती दिली. तसंच ३० हजार ९०० पदं रिकामी होती. २० हजार २४६ पदं भरली असून १० हजार ८२७ रिक्तं पदं आहेत असं सांगितलं. तसंच इतर प्रश्नांची अर्ध्या तासात आपण उत्तर देऊ असं सांगितलं.
-
यावर विजय वडेट्टीवार यांनी हा एकाच जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न नसून राज्यभरात हत्तीरोगाचे रुग्ण आहेत असं सांगत आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत माहिती विचारण्यात आली.
-
तानाजी सावंत यांनी प्रशासनाला संबंधित आदेश दिल्याची माहिती दिली. हत्तीरोगासंबंधी माहिती नाही, ती माहिती देण्यात येईल असं सांगितलं असता विरोधकांनी आक्षेप घेतला.
-
अजित पवारांनी यावेळी अध्यक्षांना तुम्ही सभागृहाला संरक्षण दिलं पाहिजे. मंत्र्यांनी आपल्याकडे माहिती नसल्याचं सांगितलं आहे. माझ्या प्रश्नाचंही उत्तर दिलेलं नाही. प्रश्न राखून ठेवा आणि नंतर उत्तर येऊ दे अशी मागणी त्यांनी केली.
-
अध्यक्षांनी यावेळी तानाजी सावंत यांना प्रश्नोत्तराचा तास संपण्यापूर्वी माहिती पटलावर ठेवा अशी सूचना केली. यानंतर विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरवात झाली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एखादा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर नसेल तर तो प्रश्न राखीव ठेवण्यास हरकत नाही. मंत्री अभ्यास करुन य़ेतील. पण पालघरचा आणि हत्तीरोगाचा विषय महत्वाचा आहे. त्यावर चर्चा करण्याची गरज असून तो राखून ठेवावा अशी विनंती केली.
-
यावर प्रश्नोतर संपवण्यापूर्वी माहिती आली तर आजच विषय संपू शकतो असं अध्यक्षांनी सुचवलं.
-
यावर दिलीप वळसे पाटील यांनी नवीन पद्धत पडत असून अशी पद्दत नाही असा आक्षेप घेतला. एक तर आता उत्तर दिलं पाहिजे, किंवा प्रश्न राखून ठेवला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
-
आज माहिती आली नाही तर, तो प्रश्न राखीव ठेवून पुढच्यावेळी उत्तर घेऊ असं अध्यक्षांनी सांगितलं.
-
यानंतर अजित पवार उभे राहिले. “आम्ही पण गेल्या ३० वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहोत. माजी विधानसभा अध्यक्षांनीही तुमच्या लक्षात आणून दिलं. तुमच्या समोरच्या लोकांनीही तुम्हाला सांगितलं पाहिजे,” असं सांगत संताप व्यक्त केला.
-
“मी साधा प्रश्न विचारला होता. पालघरमध्ये किती अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत, त्यापैकी किती पदं रिक्त आहेत, निधी किती मिळाला आणि खर्च झाला असं विचारलं होतं. पालघरमध्ये लोक दगावत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत असताना ही अवस्था आहे, त्याचं उत्तर येत नाही आमि तुम्ही प्रश्न राखून ठेवत नाही. हे बरोबर नाही,” असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला.
-
उत्तर नसेल तर राखीव ठेवू, पण असेल तर आत्ता द्यावं अशी सूचना अध्यक्षांनी तानाजी सावंत यांना केली.

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा