-
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारने दिलेली मदत तुटपुंजी असल्याची भूमिका मांडली.
-
आज १८ ऑगस्टला धरणं पूर्ण भरली आहेत. मोठा पाऊस आला, तर पाणी वाहून जाण्यासाठी धरणातलं पाणी, पाणलोट क्षेत्रातलं पाणी एकत्र होईल, तेव्हा नदीकाठच्या सर्व गावांना, शहरांना धोका निर्माण होईल, अशी भितीदेखील त्यांनी व्यक्त केली.
-
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढताना नियमावर बोट ठेवून चालणार नाही. त्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत करावीच लागेल, अशी मागणी अजित पवारांनी यावेळी केली.
-
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकीकडे सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले असताना दुसरीकडे त्यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकल्याचेही प्रसंग आले.
-
अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला. मुख्यमंत्री महोदय, आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्या ४० आमदारांना ५० कोटींची कामं दिली आहेत. भाजपानं देखील आपल्या आमदारांसाठी ५०-५० कोटींची कामं घेतली. पण असा दुजाभाव करू नका, असं ते म्हणाले.
-
“आपण मंत्रीमंडळात एकत्र असताना जी कामं आपण केली, त्याला तुम्ही आता स्थगिती देणं हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला पुन्हा एकत्र यावं लागेल, सांगता येत नाही. त्यामुळे असं करू नका”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
-
यावेळी सत्ताधाऱ्यांवर अजित पवारांनी टीकास्त्र देखील सोडलं. एक बाब फार लाजिरवाणी घडली. महाराष्ट्रात अतिवृष्टी, पीकनुकसान हे सगळं घडत असताना दौऱ्यांवर तुमचे काही मंत्री जात असताना क्रेनने मोठमोठे हार घालण्याचं काम होत होतं. तिथे माणसं मरत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आपण काय करतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-
भाषणादरम्यान अजित पवार शंभूराज देसाईंवर देखील भडकले. अजित पवारांनी २००३ मध्ये केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचं उदाहरण दिलं. तेव्हा “आता भरपूर पाऊस झालाय” असं शंभूराज देसाईंनी म्हणताच अजित पवार त्यांच्यावर चांगलेच संतापले.
-
“शंभूराज देसाई, आपण एकत्र काम केलं आहे. बोलत असताना मधे बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला म्हणताय. कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. काय सांगताय पाऊस चांगला झाला? असं ते म्हणाले.
-
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदाबाबत आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं अजित पवार म्हणाले. तुमच्याकडे कृषी मंत्रालय आलंय. त्यामुळे मी तर आश्चर्यचकितच झालो. दादा भुसे फार बारकाईने बघत होते. का त्यांच्यावर अन्याय केला गेला मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.
-
शिंदे गटाच्या ४० आमदारांसाठी वेगळं ऑफिसच उघडल्याची मिश्किल टिप्पणी यावेळी त्यांनी केली. “तुम्ही ४० आमदार कुठं जाणार नाहीत. तुमचीच कामं करणार आहेत. जरा गप्प बसा. एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू द्या. तुमच्यासाठी तर तिकडे खास वेगळं ऑफिसच उघडलं आहे. काळजीच करू नका. तुम्हाला ४० लोकांना तर फार सांभाळायचं आहे”, असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला!
-
अजित पवारांच्या भाषणादरम्यान विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे बसून बोलत असताना त्यांनाही अजित पवारांनी फैलावर घेतलं. हरीभाऊ बागडे तुम्ही बसून का बोलताय? तुमचे केस अन केस पांढरे झाले, माझे जायला लागले आणि आपण बसून का बोलताय? असा प्रश्न त्यांनी बागडेंना केला.
-
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी छगन भुजबळांच्या विधानाचा संदर्भ घेऊन त्यावरूनही टोला लगावला. राज्याला पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री लाभले आहेत. पण महाराष्ट्रात काळ्या दाढीचा प्रभाव असला तरी देशात पांढऱ्या दाढीचाच प्रभाव असल्याचं भुजबळ म्हणाले होते.
-
भुजबळांच्या विधानाचा संदर्भ देताना अजित पवारांनी सांगितलं, “मघाशी छगन भुजबळांनी सांगितलं की पांढरी दाढी, काळी दाढी. पांढऱ्याची काळी दाढी करतात असं मी ऐकलंय. पण काळ्याची पांढरी करायला लागली तरी करा, पण शेतकऱ्यांना मदत जाहीर करा.”
-
४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काय त्या विधवा पत्नींनी करायचं? का त्यांना सरकारचा आधार वाटत नाही? शेतकऱ्याला मदत करा. त्याला असं वाटू द्या की हे सरकार माझ्या पाठिशी आहे, असं देखील अजित पवारांनी सरकारला सांगितलं.
-
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढा, पंतप्रधानांना भेटा, अर्थमंत्र्यांना भेटा, ज्यांना कुणाला भेटायचं असेल त्यांना भेटा. पण राज्यातल्या शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी अजित पवारांनी सरकारकडे केली.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”