-
हिप बोन शस्त्रक्रियेमुळे सार्वजनिक आणि राजकीय जीवनापासून काही काळ लांब असलेले राज ठाकरे आज पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर चौफेर टोलेबाजी केली.
-
राज ठाकरेंनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेनेकडून पक्षाचं चिन्ह आणि नावासंदर्भात न्यायालयीन लढा दिला जात असताना त्यावरून राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
-
“माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे ते विचार आहेत”, असं ते म्हणाले.
-
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या. “आपल्याला ताकदीने आणि हिंमतीने या निवडणुका लढवायच्या आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, तडजोड करून निवडणुका लढवू नका. नुसते लाचार होऊन निवडणुका लढवू नका. शून्य किंमत राहील तुम्हाला”, असंही ते म्हणाले.
-
२०१९ साली झालेल्या सत्तानाट्यावरून देखील राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना परखड सवाल केला. “मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?” असं राज ठाकरे म्हणाले.
-
जास्त आमदार असणाऱ्याचा मुख्यमंत्री हे ठरलं असताना तुम्ही मागणी करताच कशी? मोदी व्यासपीठावर भाषण करताना तिथे उद्धव ठाकरे बसलेले होते. मोदी त्यांच्या भाषणात सांगत होते की आपली पुन्हा सत्ता येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. अमित शाह यांनीही भाषणात फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सांगितलं. त्याच वेळी आक्षेप का नाही घेतला? असा सवालही राज ठाकरेंनी केला.
-
२०१९ ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचं सरकार अस्तित्वात आलं. लोकांनी मतदान कुणाला केलं होतं? शिवसेना-भाजपाला मतदान करणारे लोक आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारी लोक, या दोघांना काय वाटलं असेल? ही हिंमत त्याच वेळी होते, जेव्हा लोक त्यांना शिक्षा करत नाहीत. जनता यांना शिक्षा करत नाही, असं देखील राज ठाकरे म्हणाले.
-
राजकारणातली माणसं अशी का वागतात. आज या पक्षात गेलो परवा त्या पक्षातून निवडणूक लढवली. मी पैसे घेतले, इकडे गेलो, तिकडे गेलो असं का होतं आहे. निवडणुकीच्या काळात. जिल्हा परिषदा वगैरे या पक्षात तिकीट नाही झालं तर या पक्षातून त्या पक्षात गेलो. मला तर लोकांची कमाल वाटते की यानंतरही ते या लोकांना मतदान करतात, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मतदारांवर नाराजी व्यक्त केली आहे.
-
यावेळी बोलताना राज ठाकरंनी नुपूर शर्मा प्रकरणावर समर्थनाची भूमिका मांडली. नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं तेच त्या बोलत होत्या. तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती, असं राज ठाकरे म्हणाले.
-
तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमान आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती, असं राज ठाकरे म्हणाले.
-
दरम्यान, मनसेनं केलेली सर्व आंदोलनं यशस्वी झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. काही वर्षांपासून त्यांनी असा प्रचार केला की राज ठाकरे आणि मनसे आंदोलनं अर्धवट सोडतो. अर्धवट सोडलेलं एक आंदोलन दाखवावं. आपण ६५ ते ६७ टोलनाके बंद केले. ज्या सेना-भाजपा पक्षांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना यातलं कुणीही जाब विचारत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
-
हातात सत्ता द्या बाकी टोलही बंद करून देतो, असा दावाही राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.
-
मोबाईल फोनवर फक्त हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं. मनसेनं आंदोलन केलं. ठाण्यात माझं भाषण सुरू असताना ठळ्ळ असा आवाज आला. दुसऱ्या दिवशी मला मोबाईल कंपन्यांची पत्र आली की लवकरात लवकर मराठी करतो. मी म्हटलं आठवड्याच्या आत हे झालं पाहिजे. ते आठवड्याभरात झालं. इतरांनी यावर आंदोलन का नाही केलं? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
-
महाराष्ट्रात राजकारणाचं स्लो पॉयझनिंग झाल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याचा हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश, बिहारसारखं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं आहे. हे ‘स्लो पॉयझनिंग’ संपवणं गरजेचं असल्याचं मत यावेळी राज ठाकरेंनी मांडलं. एकेकाळी ज्या महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं, त्याच महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याची वेळ आता आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
-
महापालिकांच्या प्रभागरचनेवरुन या मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. महापालिकेतील बहुसदस्यीय वॉर्ड पद्धतीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. बहुसदस्यीय वॉर्ड पद्धत राबवताना लोकांना गृहित धरलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
-
सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, यावर कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीधुणी काढत बसू नये, असे ठाकरे यावेळी म्हणाले. असे आढळल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
-
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर देखील भूमिका मांडली. माझं बंड भुजबळ, राणे, शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले. पण मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की राज ठाकरे आता पक्षात राहात नाही.. ती माझी शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वीची शेवटची भेट होती, असं ते म्हणाले.
-
मी आजपर्यंत ती गोष्ट तुम्हाला कधी बोललो नाही. मी मातोश्रीवर गेलो तेव्हा तिथे माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेल्यानंतर बाळासाहेबांनी मला बोलवलं. माझ्यासमोर अलिंगनासाठी हात पुढे केले. मला मिठी मारली आणि म्हणाले ‘आता जा’, अशी आठवण यावेळी राज ठाकरेंनी सांगितली.
-
बाळासाहेब ठाकरेंना समजलं होतं मी पक्ष सोडून जाणार आहे.. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. तुमच्या विश्वासावर नवा पक्ष उभा केला, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी