-
राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच शिवसेनेचे इतर नेतेमंडळी यांच्यात तुफान कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे.
-
दोन्ही बाजूंनी या ना त्या कारणाने एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकाच्या भूमिकेत सध्या राज्यात शिवसेना आणि सेनेतूनच फुटून निघालेला एकनाथ शिंदे गट असा सामना पाहायला मिळत आहे.
-
शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि भाजपाच्या साथीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राज्यातील या नाट्यमय घडामोडी घडून आता जवळपास दोन महिने उलटले आहेत. मात्र, तरीदेखील अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीप्रमाणे या घडामोडींच्या देखील सुरस कथा सगळीकडे ऐकायला मिळत आहेत.
-
या पार्श्वभूमीवर पुण्यातील बुधवार पेठ भागातील नरेंद्र मित्र मंडळाने यंदा राज्यातील हाच ‘सत्तामंथना’चा देखावा सादर करण्याचं नियोजन केलं होतं.
-
त्यानुसार प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या कारखान्यावर या देखाव्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या हुबेहूब मूर्ती साकारण्यात आल्या.
-
या दोघांसोबतच राज्याच्या या सत्तानाट्यामध्ये सहभागी इतर नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील देखाव्यामध्ये समावेश करण्यात आला.
-
नरेंद्र मित्र मंडळाने राज्यात चाललेला सत्तासंघर्षावर आधारित या देखाव्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असताना पोलिसांकडून या देखाव्याची परवानगी नाकारली आहे.
-
देखाव्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना परवानगी नाकारण्यात आल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
-
कोणत्याही प्रकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न या देखव्यातून होणार नव्हता असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, शांतता आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नवा देखावा सादर करण्याची तयारी मंडळाने सुरू केली आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य