-
भाजपाचे अनेक नेते अलिकडच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर येऊन गेले.
-
नुकतीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही राज ठाकरेंची भेट घेतली.
-
त्यापूर्वी भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.
-
याशिवाय भाजपाचे आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही भेट घेतली होती.
-
यानंतर आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.
-
या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय घडलं यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि स्पष्टीकरण दिलं.
-
“सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार?” असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
-
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आठवणींविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला.
-
“मी राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं, तेव्हाच येणार होतो. पण आज गणपतीचा योगायोग होता. त्यांच्या गणपतीचं आजच विसर्जन आहे. त्यामुळे मी आलो. दिघेसाहेबांच्या आठवणीही चर्चेतून निघाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बाळासाहेबांच्या सान्निध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल समोर आलेले फोटो…”