-
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधातील आपला विरोध तीव्र केल्याचं दिसून येत होतं.
-
पण त्याचवेळी राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या अनेक मुद्द्यांना समर्थन देत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
-
करोना काळात आणि गेल्या काही महिन्यांमध्ये देखील राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या आणि भाजपाच्या धोरणांचं कौतुक केलं आहे.
-
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज ठाकरेंनी शिवसेनेवर अनेक मुद्यांवरून टीका केली आहे. मग ते बंद दरवाजाआड अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेवरून असो किंवा मग राज्यात राबवलेल्या विविध धोरणांवरून असो.
-
राज ठाकरेंच्या याच भूमिकेमुळे भाजपा आणि मनसे यांची युतीच होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये, अर्थात शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा सामाजिक जीवनात अॅक्टिव्ह झाल्यापासून घडलेल्या घडामोडी याला कारणीभूत ठरल्या आहेत.
-
यातील महत्त्वाच्या घडामोडी या भाजपाच्या राज्यातील अनेक नेतेमंडळींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंया घेतलेल्या भेटींमुळे चर्चेत आल्या. मात्र, या प्रत्येक भेटीनंतर संबंधित राजकीय मंडळींनी ‘सदिच्छा भेट होती, यात राजकीय चर्चा झाली नाही’, असंच ठेवणीतलं उत्तर दिलं.
-
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
-
यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सत्तेच्या गणितांसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात राज ठाकरेंची भेट घेतली.
-
यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या मुख्यमंत्री शिवतीर्थवर दाखल झाले त्यामुळे. गणरायाचं आगमन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
-
राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढल्यापासून पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले होते. त्यामुळे या भेटीतून अनेक राजकीय अर्थ काढले गेले.
-
मात्र, या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसून गणरायाच्या दर्शनासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
भाजपाच्या राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे सर्वात प्रमुख नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही राज ठाकरेंसोबत भेट झाल्यानंतर आता भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची राज ठाकरेंसोबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.भाजपाच्या राज्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे सर्वात प्रमुख नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही राज ठाकरेंसोबत भेट झाल्यानंतर आता भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची राज ठाकरेंसोबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
-
येत्या पाच सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते राज ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. अमित शाह यांचीही ही ‘सदिच्छा भेट’च असल्याचं सांगितलं जात आहे.
-
दरम्यान, या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणारच, अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे मनसेसमवेत युतीबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
-
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असताना भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातीलही वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेणं आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनीही ‘सदिच्छा भेटी’च्या नावाखाली त्यांच्याशी चर्चा करणं, या सगळ्या घटनाक्रमातून भाजपा आणि मनसे या पक्षांची वाटचाल युतीच्या दिशेने होत असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे.
