-
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि ४० आमदारांसमवेत १२ खासदार देखील शिंदेगटात जाऊन मिळाले.
-
त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या ‘डॅमेज कंट्रोल’ मोडवर आहेत. यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवन आणि मातोश्रीवर स्वत: शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
-
मात्र, शिवसेनेला आधीच बसलेला धक्का अजून गंभीर करण्यासाठी की काय, शिंदेगटाकडून आम्हीच खरी शिवसेना आणि धनुष्यबाण देखील आमचाच, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा देखील यंदा शिंदेगटाचा होणार असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे.
-
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावर शांत असलेल्या उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान केलं आहे.
-
“दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या शब्दात दसरा मेळावा शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थवरच होणार आणि तो शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट केलं आहे.
-
“आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन”, अशा शब्दांत त्यांनी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
-
भास्कर जाधवांना नेतेपद देण्याविषयी उद्धव ठाकरेंनी यावेळी सूचक विधान केलं. “भास्कर जाधवांना विचारपूर्वक नेतेपद दिलं आहे. कारण आता आपल्याला लढायचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
भास्कर जाधव, तुम्हालाही शुभेच्छा देतो. तुमच्याकडून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराल, अशी मला खात्री आहे, असंही ते भास्कर जाधवांना उद्देशून म्हणाले.
-
“बाबासाहेब पुरंदरेंनी एक गोष्ट सांगितली होती. शिवाजी महाराजांनी साल्हेरचा किल्ला जिंकला, तेव्हा त्यांच्याकडच्या मूठभर निष्ठावंतांनी मोगलांच्या लाखभर सैन्याला पाणी पाजलं. त्यामुळे मला निष्ठावंत हवेत. मला समाधान हे आहे की आत्ता माझ्यासोबत असणारे कट्टर, कडवट, निष्ठावान शिवसैनिक आहेत.”
-
“मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो, असं ते म्हणाले.
-
माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
-
राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
![Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Jasprit-Bumrah-Ruled-out-of-Champions-Trophy.jpg?w=300&h=200&crop=1)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा