-
‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
-
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शाह यांनी दिले.
-
दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या शाह यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली.
-
त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
-
‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे,” असं शाह यांनी म्हटलं.
-
शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी २०१९ च्या निवडणुकांआधी झालेल्या चर्चेचे तपशील या नेत्यांपुढे विशद केले.
-
ठाकरे यांनी २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी विधानसभेत युती तोडली होती, असे सांगून शाह म्हणाले, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीआधी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरू होत्या.
-
तेव्हा शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मागितले. फडणवीस यांनी मध्यरात्री ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर असताना हे दूरध्वनीवर मला सांगितल्याचं शाह म्हणाले.
-
त्यावेळी शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी होत असल्यास युती करायची नाही, ही भूमिका मी घेतली. त्यावेळी फडणवीस तेथून बाहेर पडले, असं शाह यांनी सांगितलं.
-
त्यानंतरच्या चर्चेत आणि जाहीर सभांमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असे मी सांगितले होते अशी आठवणही शाह यांनी करुन दिली.
-
युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेआधीही ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना दिली होती, असंही शाह म्हणाले.
-
भाजपा अधिक जागा लढविणार असून भाजपाला ५१ टक्के तर शिवसेनेला विधानसभेत ४९ टक्के जागा मिळतील. ज्या जागा कायम हरल्या आहेत, त्यातील काही जागाही भाजपाला मिळाव्यात, असं ठरल्याचं शाह यांनी सांगितलं.
-
“ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह कायम असेल किंवा ते तसे बोलले, तर मी पत्रकार परिषदेतून बाहेर पडेन, इतके आम्ही ठरविले होते’’, असे शाह यांनी सांगितले.
-
“ठाकरे यांच्याबरोबर ‘मातोश्री’ निवासस्थानी केवळ अडीच मिनिटे राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि अन्य गप्पा झाल्या,” असं शाह म्हणाले.
-
“ठाकरे आणि माझ्यात बंद खोलीआड चर्चाही झाली नाही आणि मी कोणेतही आश्वासन दिलेले नाही,” असा दावा शाह यांनी केला.
-
“मी काहीही आश्वासनं दिलेलं नसतानाही ठाकरे यांनी मी मुख्यमंत्रीपद देण्याचे कबूल केल्याचा दावा केला,” असं शाह म्हणाले.
-
“वास्तविक २०१९ मध्ये युतीचे बहुमताचे सरकार आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर युतीने निवडणुकीत मते मागितली होती,” असंही केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.
-
“मात्र शिवसेनेने भाजपा व जनतेचाही विश्वासघात केला,” असंही शाह म्हणाले.
-
“उद्धव ठाकरे यांनीच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला,” असे शाह कार्यकर्त्यांसमोर म्हणाले.
-
“महाराष्ट्रातील हिंदू विरोधी राजकारण संपवायचे आहे,” असे शाह यांनी स्पष्ट केले.
-
आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी, नेत्यांना केले.
-
आता केवळ मुंबई महापालिका हे एकच लक्ष्य आहे. मुंबईतील मूळ शिवसेना भाजपाबरोबर आली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
-
अमित शहा हे आजच्या काळातील ‘चाणक्य ’ असून, हे देशाला माहीत आहे, असे फडणवीस म्हणाल़े
-
गेल्या निवडणुकीत जे निसटले, ते यंदा गमवायचे नाही, असे सांगून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले.
-
मागील निवडणुकीत १३ प्रभागांमध्ये ५० ते १०० मतांनी आपला पराभव झाला. आता १५० जागांवर विजय मिळवायचा आहे, असंही शेलार यांनी सांगितलं.
-
मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असून, आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचे आहे. गेल्या निवडणुकीत अधुरे राहिलेले स्वप्न २०२२ ला पूर्ण करायचे आहे, असं शेलार यांनी म्हटलं.
-
अमित शहा यांनी सोमवारी सकाळी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
-
त्याचबरोबर शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन व मुंबई भाजपा अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.
-
यावेळी शहा यांच्यासमवेत भाजपाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते. (फोटो सौजन्य: पीटीआय, ट्विटर आणि अमित चक्रवर्ती यांच्याकडून साभार)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच