-
संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात देखील गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तमंडळींची रस्त्यावर गर्दी दिसून आली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पुण्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात काही मोठी गणेश मंडळे आणि घरगुती गणपतींचं दर्शन घेतलं.
-
यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या सुरू असलेल्या काही राजकीय घडामोडींवर त्यांनी तुफान टोलेबाजी केली.
-
विशेषत: भाजपाच्या ‘मिशन बारामती’वरून देखील अजित पवारांनी नेहमीच्या पद्धतीने उपहासात्मक टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
-
“बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील”, असं अजित पवार म्हणाले.
-
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या बारामती दौऱ्याचाही त्यांनी समाचार घेतला. “बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये”, असं ते म्हणाले.
-
“आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या ५५ वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत”, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला.
-
“बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं. ते त्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
-
“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाली”, असा टोलाही त्यांनी बावनकुळेंना लगावला.
-
“मला त्या प्रदेशाध्यक्षांना एक प्रश्न विचारायचाय, की तुम्ही एवढे संघटनेत काम करणारे, पक्षाच्या जवळचे होता, तर तुम्हाला, तुमच्या पत्नीला २०१९ला उमेदवारी का नाकारली? त्याचं उत्तर द्या. त्याचं उत्तर कुणी देऊ शकत नाही”, असं म्हणत अजित पवारांनी बावनकुळेंना २०१९च्या विधानसभा निवडणुकांची आठवण करून दिली.
-
“कुणीही बारामतीत यावं. बारामतीकर सर्वांचं स्वागतच करतात. पण मतदानाच्या दिवशी कुणाला मतदान करायचं, कुठं बटण दाबायचं, हे बारामतीकरांना खूप चांगलं माहिती आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीच्या भवितव्याविषयी बोलताना ते म्हणाले, “मिरवणूक झाल्यानंतर दोन दिवस मी दिल्लीत असेन. तिथे महत्त्वाच्या बैठकांमध्ये निर्णय होईल. हे निर्णय़ वरीष्ठ पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते घेतात. मी राष्ट्रीय पातळीवरचा नेता नाही.”
-
दरम्यान, गणरायाकडे काय साकडं घातलं, असा प्रश्न विचारताच अजित पवारांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत उपहासात्मक प्रतिक्रिया दिली.
-
प्रत्येकवेळी बाप्पाकडे गेलं, की मागणंच केलं पाहिजे असं काही नाही. कुठे पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं, की अमकं साकडं घातलं, तमकं साकडं घातलं. दर्शनाला जायचं, तर मनमोकळेपणाने दर्शनाला जावं. सारखं त्यांना साकडं घालून घालून अडचणीत कशाला आणायचं”, असा मिश्किल प्रश्नही त्यांनी यावेळी केला.
-
निर्बंधमुक्त गणेशोत्सवाविषयी बोलताना ते म्हणाले, “या काळात उद्धव ठाकरेंचं सरकार असतं, तरी त्यांनीही निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला परवानगी दिली असती”.
-
“त्या काळात माणसांचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं गेलं.देशाच्या पंतप्रधानांनीही काही काळासाठी भारतभरात लॉकडाऊन केला होता”, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
-
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘दसरा मेळावा नेमका कुणाचा?’ या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “शिवसेना आणि शिंदे गटाने त्यांच्या परिने मेळावे घ्यावेत. मेळावा घेण्याचा मान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे”, असं ते म्हणाले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात एका कार्यक्रमाला येताना दोन तास उशीरा आल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्यावरूनही अजित पवारांनी सूचक शब्दांत टोला लगावला आहे.
-
“मला वेळेवर जाण्याची सवयच आहे. चुलत्याचं बघून आपल्याला सवय लागली. शरद पवारही प्रत्येक गोष्ट वेळेत करतात, मीही वेळेत करतो. आम्हाला जसं आमचा वेळ महत्त्वाचा असतो, तसा बाकीच्यांनाही त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो. प्रमुख व्यक्तीने वेळेचं पालन केलं, तर त्याचा सर्वांनाच फायदा होतो, मदत होते”, असं ते म्हणाले.
-
दरम्यान, पुण्यात पालकमंत्री आणि महापौर नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या हस्ते मानाच्या गणपतीची पूजा करण्याची वेळ ओढवल्याबाबत विचारणा केली असता “हे सरकार आल्यापासून ही वेळ ओढवली”, अशा शब्दांत अजित पवारांनी टोला लगावला.
![Ajit-pawar-new](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/09/Ajit-Pawar-gf.jpg)