-
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपाचा प्रस्ताव आहे.
-
त्यांनी (शिंदे गटाने) मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाट्यातील जागा द्याव्यात, असा भाजपाचा विचार आहे.
-
न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
-
भाजपा नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत.
-
मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपाची तयारी नाही.
-
शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपाची रणनीती आहे.
-
भाजपाने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.
-
शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल.
-
मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपाला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे.
-
त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आले आहे.
-
मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत.
-
मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजपा उमेदवार देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजते.
-
काँग्रेस, समाजवादी व अन्य पक्ष, मुस्लिमबहुल विभाग अशा सुमारे ४० जागांवर भाजपा निवडून येऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपाने १९४ जागा लढवून ८२ जागांवर विजय मिळविला होता.
-
आता शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत.
-
शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपाला जिंकून येण्याचा टक्का (स्ट्राईक रेट) वाढवावा लागणार आहे, असे ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले.
-
राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
-
मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार, याबाबत निर्णय घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगास देण्यात आली तर ऑक्टोबरमध्ये निर्णय होऊ शकतो.
-
मात्र, ती न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह मिळू शकते.
-
तसे झाल्यास भाजपाकडून शिंदे गट आणि मनसेसंदर्भातील रणनीती बदलली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
-
शिवसेनेसंदर्भातील याचिकेबरोबरच सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनेविषयीची याचिका प्रलंबित असून, त्यावर निर्णय झाल्यावरच निवडणूक कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे.
-
सर्वोच्च न्यायालयातील या याचिकांच्या सुनावणीनंतरच रणनीती व जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संबंधितांनी सांगितले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा हे युतीत निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
-
सध्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे मुंबई भाजपाचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
-
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती किंवा सहकार्य कोणाशी करायचे, कसे करायचे, याबाबत सर्व निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
-
तर मनसेशी युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबरही जागावाटप झालेले नाही, असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
-
शिंदे गट आणि मनसेसंदर्भातील भाजपाच्या या योजनेसंदर्भात प्रतिक्रिया मिळवण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी अनेकदा संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO