-
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सध्या राज्यात जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
-
या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, शिंदे गटातील बंडखोर आमदारांवरही त्यांनी तोंडसुख घेतलं.
-
महाराष्ट्रात कधीही एवढं घाणेरडं राजकारण झालं नव्हतं. जिथल्या आमदारांनी गद्दारी केली, तिथे मी विचारणा करतोय की जे काही घडलं, ते योग्य होतं का? सगळीकडून संतापच व्यक्त होतोय, असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले.
-
शिवसंवाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला त्या गद्दारांकडून निरोप यायला लागले, खोक्यांबद्दल नाही..तेवढी त्यांची हिंमत नाही, पण त्यांचे निरोप आले की आदित्य ठाकरेंना सांगा आम्हाला विश्वासघातकी म्हणा, पण गद्दार म्हणू नका. किती निर्लज्जपणा हा..विश्वासघातकी आणि गद्दार यात काही फरक आहे का? म्हणे खोके सरकार म्हणू नका.मग काय म्हणायचं? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला.
-
५० खोके एकदम ओके हे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात गेलं आहे. कारण त्यांना पटलं आहे की यांनी स्वत:ला खोके घेतले आणि महाराष्ट्राला धोके आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
-
मुंबईत या सरकारनं घोषणा केली की मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने १४० मोफत दवाखाने सुरू करतोय. पण त्या दवाखान्यांची कल्पना, त्याचं बजेट पालिकेतून शिवसेनेनं दिलं आहे. उद्धव ठाकरेंचं ते स्वप्न होतं, अशी आठवण आदित्य ठाकरेंनी करून दिली.
-
यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री ट्रान्सहार्बर लिंकचं काम बघायला गेले. पत्रकारांनी त्याबद्दल प्रश्न विचारले, तर लगेच पेपरमध्ये वाचायला लागले की नेमका काय आहे प्रकल्प.. ही साधी उत्तरं, साधी माहिती या खोके सरकारकडे नाही. मला लाज या गोष्टीची वाटतेय”.
-
आम्ही १५ शिवसेनेचे आमदार विधानभवनाच्या बाहेर उभे होतो. त्यांच्यातले काही मंत्री निर्लज्जपणे आम्हाला विचारत होते की तुम्हाला हवेत का? देशात, महाराष्ट्रात असा निर्लज्जपणा बघितलाय का? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी यावेळी विचारला.
-
मी सांगतो, या सगळ्यांना मंत्रीपद द्या. मिळतंय का बघा. गद्दारीच्या आधी जी चॉकलेटं तुम्हाला मिळाली होती, तेवढं महत्व तुम्हाला आज मिळतंय का? असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.
-
ज्या मिनिटाला पत्रकारांनी उद्योगमंत्र्यांना विचारलं की वेदान्तचा प्रकल्प गुजरातला गेला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले मी माहिती घेऊन सांगतो. मी ३२ वर्षांचा तरुण असूनही सरकारमधून बाहेर पडल्यानंतर एवढी माहिती देऊ शकतो, मग उद्योगमंत्र्यांकडे यासंदर्भात माहिती नसावी? असा परखड सवाल आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना विचारला आहे.
-
आपण जे जिंकायला पाहिजे होतं ते आपण हरतो कसं हे आपल्याला कळत नाही? तुम्ही आमच्यापेक्षा सक्षम आहात, तर मग प्रकल्प हातातून गेलाच कसा?
-
‘बाजीगर’ चित्रपटाचा डायलॉग आहे.. हार के जितने वाले को बाजीगर कहते है.. पण इथे तर जीतके हारने वालेको खोके सरकार कहते है, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
-
हे डबल इंजिनचं सरकार असताना यांचं एक इंजिन फेल झालंय का? बलट्रक पार्कचा प्रकल्पही आपल्या हातातून गेला हे यांना माहितीही नाही. हेच इतर राज्यात झालं असतं तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिचारे दहीहंडी, गणेशोत्सवात खूप व्यग्र आहेत.
-
ठाकरे सरकारला नागपूरमध्ये एअरबसची कंपनी आणायची होती. तीन दिवसांपूर्वी मी बोलेपर्यंत या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, उद्योगमंत्र्यांना एअरबस नावाचा प्रकल्प आहे हे माहितीही नव्हतं. आज म्हणतायत आम्ही एअरबस प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहोत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
-
उद्योगमंत्र्यांना माहिती नाहीये महाराष्ट्रात उद्योग किती आहेत. दुसरे एक मंत्री संजय राठोड आहेत. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. पण आजही शपथविधी झाल्यानंतर मंत्रीपदाचा पदभार घेतलेला नाही. काम सुरू केलेलं नाही. असे मंत्री मंत्रिमंडळात का आहेत? अनेत मंत्र्यांनी बंगले घेतलेत, पदं घेतली आहेत. पण महाराष्ट्रात अजून पालकमंत्री जाहीर झाले नाहीयेत, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं.
-
तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होतं. असं गद्दारांसारखं करायला नको होतं. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली. महाराष्ट्रानं तर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेल, असंही आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.
-
चूक एवढीच झाली की लायकीपेक्षा जास्त त्यांना दिलं. त्यांना अपचन झालं आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावं लागलं, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
-
आधी यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमुळे आम्ही गेलो. मग सांगितलं निधी मिळत नव्हता म्हणून गेलो. मग सांगितलं हिंदुत्वासाठी पलीकडे गेलो. मग सांगितलं भगव्या झेंड्याकडे गेलो. आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे गणपतीत कुर्ते घालत होते, आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून आम्ही नाराज आहोत, अशा खोचक शब्दांत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.
![aaditya thackeray](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/09/Aaditya-Thackeray-15.jpg)