-
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या सडेतोड आणि हजरजबाबी स्वभावामुळे सर्वश्रुत आहेत. विरोधी पक्षनेते झाल्यापासून अजित पवारांनी त्यांच्या याच स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
-
आज बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या घडामोडींवरून त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीकास्र सोडलं.
-
आज आपल्या राज्यात जवळपास पाऊण लाख सरकारी जागा आपण भरू शकतो. त्या भरायला हव्यात. आता शिंदेंचं सरकार आलं आहे. पण तसं चित्र राज्यात दिसत नाही, असं ते म्हणाले.
-
वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही अजित पवारांनी भूमिका मांडली. हे आमच्यावर आरोप करतात. पण १५ जुलै २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता मुख्य सचिवांच्या चेंबरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत प्रकल्प येणार म्हणून सविस्तर चर्चाही झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
-
वेदान्त प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात एक लाख ५७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा या बैठकीत संदर्भ होता. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हता, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. हे म्हणतात आम्ही लोकांनी हे केलं. पण ही बैठक तर १५ जुलैची आहे. त्यात हे लोक कमी पडले. सरकार कमी पडलं, असं अजित पवार म्हणाले.
-
आता म्हणतात मागच्या सरकारनं काय केलं. अरे मागच्या सरकारनं केलं काय सांगताय तोंड वर करून. १५ जुलैची मीटिंग आहे. काहीही बोलता काय? खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.
-
यांच्या नाकर्तेपणामुळे आज दीड ते दोन लाख तरुणांच्या नोकरीवर गंडांतर आलं आहे. त्यावर काय सांगतात, तर दुसरा प्रकल्प आणतो. अरे दुसरा काय आणतो? तुझ्या काय घरचं आहे का दुसरा आणतो. हा वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
-
सत्तेची मस्ती आणि सत्तेची नशा आणि सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे हे या सरकारनं लक्षात घ्यावं. आम्हीही लक्षात ठेवतो. आम्हीही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
-
आम्हाला वाटलं नव्हतं सरकार जाईल. पण काहींनी सरकार घालवलं. महाराष्ट्राच्या समोर आलं आहे की हे सरकार कुणी घालवलं. कोण पडद्यामागं काम करत होतं. कोण वेगवेगळ्या पद्धतीने वेश बदलून बाहेर पडत होते. या पद्धतीचं राजकारण तुम्ही करताय, असं म्हणत अजित पवारांनी भाजपावर निशाणा साधला.
-
ज्यांचं सरकार आलंय, त्यांना चालवू द्या ना. केंद्रात तुमचं सरकार आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये तुमच्या विचारांचं सरकार आहे. अजून किती सरकारं हवी आहेत तुम्हाला? सगळंच तुम्हाला पाहिजे? गोव्यात काही थोडे काँग्रेसचे आमदार होते, त्यांनाही घेऊन टाकलं. कुठे ठेवाल त्यांना? तुमचे आहेत, ते आणखी नवीन आले. कर्नाटक, मध्य प्रदेशात सरकार पाडलं, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.
-
भारतीय लोकशाही वेगळ्या प्रकारची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय बहुमताचा आदर करा. फोडाफोडीचं रादकारण, खोक्यांचं राजकारण करायला सांगितलं नाही, अशी आठवण अजित पवारांनी करून दिली.
-
सुरुवातीच्या काळात फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीच मंत्रिमंडळात होते यावरूनही अजित पवारांनी टीकास्र सोडलं. सरकारमध्ये येऊन दोनच जण सरकार चालवत होते. मग हा प्रकल्प का गेला? का इतरही प्रकल्प चाललेत? का त्याबद्दल तुम्ही निर्णय घेत नाहीत? त्याबाबत पाठिंबा द्यायला आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले.
-
सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कुणाला? हे तर आकरितच झालं. कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो, त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? असा सवाल अजित पवारांनी सरकारला केला आहे.
-
काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या आमदाराच्या मेळाव्यात त्यांच्या आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता? असा प्रश्न अजित पवारांनी संजय शिरसाट, गायकवाड, सदा सरवणकर यांना लक्ष्य करत विचारला.
-
“काही आमदार म्हणतात गिन गिन के, चुन चुन के मारेंगे.. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला काय करतंय आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? गिनता तरी येतं का?”
-
आजही पितृपक्ष सुरू असल्यामुळे चार्ज घ्यायचा नाही असं चालू आहे. अरे असं कुठे असतं का? मागे गणेशोत्सव होता म्हणून चार्ज घेत नव्हते. मंत्रालयात गेलो तर तिथले सेक्रेटरी लोक सांगतात दादा अजून १२-१३ लोकांनी अजून चार्जच घेतला नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला.
-
काय पाहिजे म्हणजे चार्ज घ्याल? का यांना चार्ज केल्याशिवाय चार्ज घेणार नाही? नेमकं काय करायचं? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की उद्या चार्ज घ्या. कामं खूप आहेत. लोकांचे प्रश्न, अडचणी आहेत. कमिट्यांच्या बैठका घ्या. काहीच करायला तयार नाहीत. न्याय मागायचा कुणाला? या गोष्टीचा विचार कधी करणार? असे परखड सवाल अजित पवारांनी सरकारला केले आहेत.
-
आमच्या काळात एसटीचा संप झाला, तेव्हा बेंबीच्या देठापासून ओरडत होते एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी करा. आता काय झालं? तीन महिने झाले, का गप्प बसलात? कुणी अडवलं? तेव्हा वेगवेगळे नेते तिथे जाऊन मैदानावर झोपले होते. काय झालं? ते आता तिकडे घरात गोधडीत झोपलेत. आता जा ना, असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना एसटी संपाची आठवण करून दिली.
-
तुमच्या विचाराचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत. आम्ही सरकारमध्ये आलं की वेगळ्या मागण्या करायच्या आणि हे सरकारमध्ये आले की सोयीस्कररीत्या विसरायचं. ही दुटप्पी नीती लोकांनी ओळखायला हवी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
-
अशा प्रकारे महाराष्ट्रानं कधीच फुटाफुटीच्या राजकारणाला महत्त्व दिलं नाही. मागेही शिवसेना ९०-९२ला फुटली होती. त्यानंतरही फुटली होती. पण नंतर फुटलेला एकही निवडून आला नाही. लोकांनी त्यांना बाजूला केलं. तुम्ही लोकांची विश्वासार्हताच गमावली आहे, असा इशारा अजित पवारांनी शिंदे गटाला दिला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून, त्यांचा भगवा हातात घेऊन तुम्ही निवडणुकांना सामोरे गेलात. लोकांनी तुम्हाला मतं दिली. आता काय चमत्कार घडला की सूरतला गेल्यानंतर सगळं बदलून गेलं? शिवाजी महाराजांचा सूरतचा इतिहास काय सांगतोय? आणि आमच्याइथले तिकडं सूरतला जाऊन बसलेत, अशी खोचक टिप्पणीही अजित पवारांनी यावेळी केली.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”