-
एकीकडे राज्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील कलगीतुरा दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना दुसरीकडे आगामी निवडणुकांमध्ये कुणाची युती होणार आणि कोण कुणाच्या विरोधात लढणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशपातळीवरील राजकारणापासून राज्यातील राजकीय घडामोडींपर्यंत सर्वच मुद्द्यांवर टोलेबाजी केली आहे.
-
प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शिवसेना-शिंदे गट सुंदोपसुंदीपर्यंत सर्वच बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
-
ईडीकडून देशभरात सुरू असलेल्या कारवायांवर यावेळी प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला. माझं ईडीला म्हणणं आहे की, तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा, असं ते म्हणाले.
-
कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं, याला घटना मान्यता देत नाही, असंही आंबेडकर म्हणाले.
-
रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या एका अहवालावरून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात. हे देशाच्या हिताचं नाही, असं ते म्हणाले.
-
माझ्या भाषेत सांगायचं झालं, तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आत्ता पुष्टी दिली आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.
-
“सध्या देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. नेहरुंनी कबुतरं शांतीसाठी सोडली होती. पण नेहरूंनी त्यांच्या वाढदिवशी कबुतरं नाही सोडली. पण मोदींनी स्वत:चा वाढदिवस बघितला आणि चित्ता आणला. त्यातून सगळ्यांना चित्ता सोडण्याची भीती दाखवली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
-
आत्तापर्यंत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स होता. आता चित्ता आहे. या दोन वेगवेगळ्या वृत्ती आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
-
दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाही वेदान्त प्रकल्पावरून लक्ष्य केलं.
-
मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगतो की वेदान्तची बोलणी महाराष्ट्र सरकारशी कधी सुरू झाली हे सांगा. ती तारीख कळली, तर शेलारांनी केलेले आरोप खरे आहेत की खोटे हे ठरेल, असं ते म्हणाले.
-
एवढा मोठा प्रकल्प येतो. लाखभर रोजगार निर्माण होणार. त्यासोबतच राज्य सरकारला २६ हजार कोटींचं उत्पन्न येईल. असा प्रकल्प असता तर माझ्यासारख्यानं म्हटलं असतं सगळ्या सुविधा घ्या, अशी मिश्किल टिप्पणीही प्रकाश आंबेडकरांनी केली.
-
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादावरही प्रकाश आंबेडकरांनी भूमिका मांडली. निवडणूक चिन्हाचा कायदा संसदेनं केलेला नाही. हा निवडणूक आयोगानं स्वत:हून केलेला कायदा आहे. त्यानुसार पक्षातील वादानंतर निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचं, त्याचा अधिकार आमचा असेल, असं आयोगानं स्पष्ट केल्याचं आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
मुळात निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाच्या वादात शिरूच शकत नाही. आता एक संधी मिळाली आहे की पक्षांतर्गत भांडणात निवडणूक आयोगाला अधिकार आहे का? हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवावं, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.
-
काँग्रेसला आता लढण्यासाठी नवी शस्त्र उभी करावी लागतील. नवीन विषय मांडावे लागतील. सध्याच्या परिस्थितीशी तुम्ही कसं जुळवून घेणार, हा त्यातला विषय आहे. समाजात द्वेष वाढतोय ही चिंता आहे, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला.
-
दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत निशाणा साधला. “ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कुठेही युती झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या जागा गेल्या आणि खुल्या वर्गात निवडणुका झाल्या, त्यातही महाविकास आघाडी युतीमध्ये लढली असं कुठेच चित्र नाही, असं ते म्हणाले.
-
आम्ही शिवसेनेसोबत एकत्र जाणार असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतेय. काँग्रेस शिवसेनेसह कम्फर्टेबल नाहीत. राष्ट्रवादी स्वत:हून सेनेसोबत जायचं म्हणत आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत कुठेही राष्ट्रवादीसोबत जाण्यासंदर्भात संकेत दिसत नाहीत, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी यावेळी लगावला.
![prakash ambedkar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-21-at-6.50.02-PM-3.jpeg)