-
एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थक करणारे ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत फुटी पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेत प्रमुख विरोधक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीबरोबरच शिंदे गटाला लक्ष्य केलं.
-
यावेळेस ठाकरेंनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करतानाच शिंदे गटाला बाप पळवणारी टोळी म्हटलं.
-
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही तासांमध्ये दिल्लीतील भाषणातून जशास तसं उत्तर दिलं आहे. यामध्ये अगदी ठेचा खाणाऱ्यांपासून ते शिवसैनिकांकडून शपथपत्र घेण्यापर्यंतच्या मुद्द्यांना शिंदे यांनी घात घातला आहे.
-
“आज राज्याच्या प्रमुखांनी मला मिंधे गट म्हटलं आहे. आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर कोण गेलं? मिंधेपणा कोणी केला हे सर्व महाराष्ट्र आणि देश बघतोय,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटलं.
-
तसेच उद्धव ठाकरेंनी आस्मान दाखवण्यासंदर्भात केलेल्या विधानालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
-
“त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही आता आसमान दाखवू. कोणाला तर आम्हाला आसमान दाखवणार. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला आसमान दाखवण्याची वेळ तुमच्यावर येणारच नाही, कारण आम्हीच तुम्हाला तीन महिन्यांपूर्वी आसमान दाखवलं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.
-
“शिवसैनिकांवर विश्वास नाही म्हणून त्यांच्याकडून खर्च करुन घेत शपथपत्रं घेत आहेत,” असा टोमणाही शिंदेंनी लगावला आहे.
-
“ते (कार्यकर्त्यांना) भेटत नाहीत म्हणून अनेकजण माझ्याकडे आलेत. मी नक्की सगळ्यांना भेटणार कारण मी तुमच्यातलाच एक आहे,” असा शब्दही शिंदेंनी आपल्या भाषणात समर्थकांना दिला.
-
“आम्ही ढोकळा खायला लागलो अशी टीकाही त्यांनी केली. अरे पण आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो आहोत. म्हणून तर त्यांना ठेचलंय,” असंही शिंदेंनी म्हटलं.
-
ठेचा खाऊन मोठं झाल्यानेच आपल्या लोकांनी त्यांना ठेचलंय ना. महाविकास आघाडी खाली पाडण्याचं काम छोटं काम नव्हतं,” असं विधानही शिंदे यांनी केलं.
-
यानंतर शिंदेंनी बाप चोरणारी टोळी या टीकेवरुनही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे काय म्हणाले या टीकेबद्दल हे जाणून घेण्याआधी उद्धव ठाकरे काय म्हणाले होते हे पाहूयात..
-
“मुले पळवणारी टोळी कार्यरत असते, हे आतापर्यंत माहित होते. पण, आता बाप पळविणारी औलाद आली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला बीकेसीमध्ये झालेल्या मेळाव्यातील भाषणामधून लक्ष्य केले.
-
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या फोटोकडे पाहूनही शिंदे गटाला टोला लगावला.
-
बाळासाहेबांचा फोटो आहे ना, असा सवाल करीत ‘नाही तर तो पण पळवून नेलेला असायचा’, अशी टिप्पणी करत उद्धव यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
-
उद्धव यांनी केलेल्या या टीकेचे उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील भाषणातून जशात तसं उत्तर दिलं.
-
“आम्हाला म्हटलं बाप चोरणारी टोळी. खरं म्हणजे आम्हाला अभिमान आहे. बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते” असं शिंदेंनी म्हटलं.
-
बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही शिवसैनिक आहोत, असंही शिंदे यांनी म्हटलं.
-
“आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे असं आम्ही म्हणायचं का?” असा प्रश्न शिंदेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.
-
“अरे काय म्हणताय तुम्ही? काय सांगताय? लोकांची मनं, मतं बघा. जनतेच्या मनाचा आदर करा,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना दिला.
-
“आम्ही टीका करणार नाही. आम्ही कामाने तुम्हाला उत्तर देऊ,” असं शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला उत्तर देताना दिल्लीतील भाषणात म्हटलं.
-
आता शिंदेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
![Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/funny-viral-quote-in-bike-photo.png?w=300&h=200&crop=1)
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल