-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
-
एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. मात्र, बाळासाहेबांची सावली बनलेले चंपासिंग थापा आहे तरी कोण? जाणून घेऊ.
-
जवळपास ३५ वर्षांपूर्वी नेपाळमधून आलेला आणि गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरणारा हा पोरगा भांडुपचा नगरसेवक के. टी. थापा याचा हात धरून ‘मातोश्री’त आला आणि त्याने स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करून टाकले. थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले.
-
तेव्हापासून तो बाळासाहेबांची सावली बनला. साहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हे थापाने स्वत:चे व्रत मानले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा थोडय़ाच काळात मातोश्री परिवाराचा सदस्य झाला.
-
त्याच्या सेवावृत्तीने बाळासाहेबही भारावले आणि थापा हा बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनला. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर कुटुंबवत्सल बाळासाहेब आणखीच हळवे बनले, तेव्हा थापा हा त्यांचा खूप मोठा भावनिक आधार होता.
-
हे मातोश्रीशी जवळीक असलेल्या अनेकांना माहीत आहे. मीनाताईंच्या पश्चात बाळासाहेबांची काळजी हेच जीवन मानून थापाने बाळासाहेबांसाठीच प्रत्येक क्षण वेचला.
-
थापाचे कुटुंब नेपाळात, तर दोन मुले दुबईत असतात. वर्षांतून कधीतरी तो कुटुंबियांकडे जातो, पण ते केवळ त्याचे शरीर असते. मन इथे, बाळासाहेबांसोबत सावलीसारखेच असायचे.
-
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा विस्तार करण्याच्या पहिल्या प्रयोगाला थापाचा मोठा हातभारही लागला. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापाची भूमिका महत्त्वाची होती.
-
बाळासाहेबांनी त्याच्यावर अपार विश्वास टाकलाच, पण आपले मनदेखील अनेकदा त्याच्याजवळ मोकळे केले. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच थापाची लहानशी खोली आहे.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख