-
राज्यात सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरु असून सर्वांचं लक्ष आता दसरा मेळाव्याकडे लागलं आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास परवानगी देत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला द्यायचं हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
-
उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
-
यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं.
-
“माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत,” असा टोला त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचं नाव न घेता लगावला.
-
“ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
-
“गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.
-
“नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
-
“दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात. शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध राहा,” असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.
-
“आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो,” असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
-
पुढे ते म्हणाले “पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे. लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा”.
-
All File Photos

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral