-
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी ओळखले जातात. पुण्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली!
-
अजित पवारांनी यावेळी बोलताना राज्यातल्या वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, काही मुद्द्यांवर खास त्यांच्या शैलीत टोलेबाजीही केली.
-
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न करत राहिल”.
-
दसरा मेळाव्यावरील वादावरही अजित पवारांनी भूमिका मांडली. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये दसरा मेळाव्याबाबत आता ईर्षा उत्पन्न झाली आहे, असं अजित पवार म्हणाले.
-
“कुणाचा दसरा मेळावा मोठा होणार? याबाबत आता दोघांमध्ये एक ईर्षा निर्माण झाली आहे. नियमांचं पालन करून आपला मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीमध्ये सर्वांना आहे. तसाच ते करतील”, अशी अपेक्षा अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली.
-
दरम्यान, एकाच वेळी दोघांचं भाषण सुरू झालं, तर कुणाचं ऐकणार? असं विचारताच अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. “उद्धव ठाकरेंचं भाषण आधी ऐकू. नंतर एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकू. अर्धा तास पुढे-मागे झालं म्हणून बिघडलं कुठे?” असं ते म्हणाले.
-
शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, “कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाराज ठेवायचं हा त्यांचा अधिकार असून त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याचं काम नाही. त्यांच ते ठरवतील”.
-
“काही महिने तर दोघे जणच सर्व पाहात होते.आता कुठे २० जण झाले. सांगून सांगून आत्ता कुठे त्यांनी पालकमंत्री नेमले आहेत.त्यामुळे त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल,तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतील.हे सर्व जनता पाहत आहे”, असंही ते म्हणाले.
-
बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आपण असं काहीही केलं नसल्याचा दावा नंतर बच्चू कडूंनी केला असला, तरी हे आपल्याला अजिबात योग्य वाटलं नसल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
-
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारणा केली असता त्यांच्या यात्रेत सहभागी होणार नसल्याचं ते म्हणाले. ती काही महा विकास आघाडीची यात्रा नाही.काँग्रेस पक्षाची यात्रा आहे. आम्ही यात्रेच्या मार्गाने जात असू तर उतरून त्यांना शुभेच्छा देऊ,बेस्ट ऑफ लक म्हणून पुढे जाऊ, असं त्यांनी सांगितलं.
-
काँग्रेसकडून ‘एकला चलो रे’चा नारा दिला गेला असेल, तर त्यांना शुभेच्छा असल्याचं अजित पवार म्हणाले. ज्यांना एकट ज्यांच त्यांनी एकट जावा.मी आवाहन केल्यानंतर ज्यांना आमच्या सोबत यायचंय त्यांनी आमच्या सोबत चला.आमची कोणालाही बळजबरी नाही, असं ते म्हणाले.
-
“असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही.आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. त्याला महत्त्व न देता, त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला.दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावं. इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असं माझं सत्ताधाऱ्यांना आवाहन आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
-
यावेळी अजित पवारांनी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर तोंडसुख घेतलं. “महाविकास आघाडीत मुंडकं खाणारा डायनासॉर आहे” अशी टीका अब्दुल सत्तारांनी केली होती. त्यावर अजित पवारांनी निशाणा साधला.
-
सरस्वती देवीच्या फोटोविषयी छगन भुजबळांनी केलेल्या विधानाविषयी विचारणा करताच अजित पवारांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भुजबळांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. हे पक्षानं सांगितलं आहे. प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ती पक्षाची भूमिका नाही”, असं अजित पवार म्हणाले.
-
अशोक चव्हाणांनी आघाडीच्या प्रस्तावाविषयी केलेल्या विधानावर अजित पवारांनी “शिळ्या कढीला ऊत कशाला आणता?” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळातच शिंदेंसोबत शिवसेनेचं शिष्टमंडळ काँग्रेसकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव घेऊन आलं होतं, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता.
-
२०१४ला अमुक झालं आणि २००८ ला तमुक झालं, या चर्चा करायला कोणाला वेळ नाही आणि याला महत्त्व द्यायला नागरिकदेखील मोकळे नाहीत.महागाई आणि बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांवरचं लक्ष विचलित करण्यासाठी या वक्तव्यांना महत्त्व दिलं जात आहे”, असं अजित पवार म्हणाले.
-
“मी सरळमार्गी आहे. मलाही हेच वाटतं आणि मतदारांनाही हेच वाटत असणार की चांगले लोक निवडून यावेत. कोणाला मुस्काटात मारणारी, पिस्तूल वर उडवणारी, कायदा हातात घेणारी,अशी माणसं नसावीत.चांगली माणसं निवडून यावीत हीच भावना सर्वांचीच असते”, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
-
यावेळी बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यांवरही प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरेंनी दौरे काढले, त्यात तुम्हाला काय त्रास होतो? प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना राज्यात दौरे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार प्रत्येकजण आपापले दौरे करतोय. जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना ज्यांची भूमिका पटेल, त्यांच्या पाठिशी ते उभे राहतील”, असं ते म्हणाले.
-
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत पालकमंत्रीपदावरून झालेल्या कलगीतुऱ्यावरूनही अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस कसं सांभाळणार?” असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर “जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन”, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
-
“मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की ट्रेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या ट्रेनिंगकरता काही फी लागणार आहे का ? की ते मोफत दिलं जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो”, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
-
PFI वरील कारवाईसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, “लवकर कारवाई व्हायला हवी. आमचा तपास सुरू आहे, असं सांगितलं जातंय.पण तपास लवकर संपवावा. एवढा वेळ लावण्याचं काही कारण नाही”.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”