-
दोन महिने चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर आज मुंबईत शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान या दोन्ही ठिकाणी दसरा मेळावे पार पडले.
-
बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला असून शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजपा, देवेंद्र फडणवीस अशा सर्वांवरच तुफान टोलेबाजी केली.
-
गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झाला आहे. अभूतपूर्व आहे हे. मी भारावून गेलो आहे.
-
मी त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
-
यानंतर रावणदहन होणार आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
जेव्हा मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा, म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा, कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
ज्यांना आपण सगळं काही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या.. ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे.
-
जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं. गद्दारांनी सांगायचं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
-
मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? असा सवालही त्यांनी एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
-
अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसंच ठरलं होतं. भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय.
-
देवेंद्र फडणवीस म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
-
मी सांगतो शांत राहा, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
-
कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचं की हे थडगं बघा कसं सजवलं. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता? असा सवालही त्यांनी भाजपाला केला.
-
तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत.
-
अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये. नुसतं या राज्यात जा, त्या राज्यात जा, इकडे काड्या घाल, हे सरकार पाड, ते सरकार पाड. मुंबईत येऊन म्हणे शिवसेनेला जमीन दाखवा. बघा आम्ही जमिनीवरच बसलो आहोत. आम्ही जमिनीवरचीच माणसं आहोत, अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
-
मी आज अमित शाह यांना आव्हान देतोय की आम्हाला जमीन बघायचीच आहे. आम्हाला जमीन दाखवा. पण ती पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा. हिंमत असेल तर ती एक फूट जमीन जिंकून दाखवा. ती आमची मातृभूमीच आहे. ८ वर्ष झाली. मोदींच्या मुलाखती आजही ऐकतो आम्ही. पाकिस्तानको उनकी भाषा में उत्तर देना चाहिये.. कोणती भाषा? असंह ते म्हणाले.
-
पुष्पा आला होता ना.. झुकेगा नहीं साला.. आणि हे म्हणतात उठेगा नहीं साला. एक बार झुकेगा तो उठेगाच नही.. आता यांच्या सरकारला १०० दिवस होतायत. त्यातले ९० दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ!
-
चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं आहे. मग व्याख्या स्पष्ट आहे.
-
देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते, असाही इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
-
मोहन भागवत मध्ये मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही.
-
माझा तर विचार होता की या सभेला येण्याऐवजी तिथे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकावेत. ईडीच्या कार्यालयात गेलं की लगेच यांच्या हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.
-
रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे?
-
माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
-
मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे.
-
आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो तेव्हा औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.
-
अंगावर आता आलेलाच आहात, आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावं लागेल, असंही ते म्हणाले.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स