-
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भुजबळांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
-
“छगन भुजबळ आपल्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं गेल्यानंतरही आज जिद्दीने उभे आहेत. बेळगावमधील फोटो कोणी पाहिला तर माझ्यावर पुन्हा एकदा हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होईल,” असं मिश्कीलपणे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“चार महिने अधिक मिळाले असते तर भुजबळ मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार म्हणाले. पण मी त्यात थोडी सुधारणा करु इच्छितो. जर भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर त्याच्या आधीच ते मुख्यमंत्री झाले असते”. उद्धव ठाकरेंचं हे विधान ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
-
“सरकार वाचवण्यात ते किती हुशार आहेत हे आत्ता तुम्ही मला सांगत आहात, तेव्हाच सांगायला हवं होतं. मी पण त्यांना कामाला लावलं असतं,” असंही उद्धव ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले.
-
“आता आम्ही धक्काप्रूफ झालो आहोत. पण भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा आमच्या कुटुंबाला सर्वात पहिला मानसिक धक्का बसला होता,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.
-
“बाळासाहेब, माँ आणि आम्हालाही धक्का बसला होता. आपल्या कुटुंबातील माणूस सोडूनच कसा जाऊ शकतो हाच मोठा धक्का होता. राग वैगेरे हा तर राजकारणाचा भाग झाला, पण आपला माणूस जाणं मोठा धक्का होता. त्यातून मानसिकदृष्ट्या सावरताना आम्हाला वेळ लागला,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.
-
पुढे ते म्हणाले “बाळासाहेब असतानाच तुम्ही हे सर्व मिटवून टाकलंत हे चांगलं केलं. घरी आल्यावर बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. सर्व मतभेद तुम्ही मिटवून टाकलेत. फक्त त्यावेळी माँ हव्या होत्या”.
-
शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली होती. मात्र शरद पवार, काँग्रेस यांच्या रुपात वादळ निर्माण करणारी लोक सोबत असल्यामुळे मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
आपल्या भाषणात त्यांनी मिश्कील टोलेबाजी करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या रुपात सोबत राहावे, असे आवाहन केले. छगन भुजबळ यांची ही पहिलीच पंचाहत्तरी आहे. पुढच्या पंचाहत्तरीलाही सोबतच राहा. आम्हाला कार्यक्रमाला बोलवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
तसेच महाविकास आघाडीची सत्ता ही तुमच्या हातात आहे. नेत्याचा जयजयकार करून चालणार नाही. कार्यकर्त्यांनी सोबत यावे लागेल. ही लढाई माझ्या एकट्याची नसून सर्वांचीच आहे. ही लढाई देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
प्रत्येकाचे वय वाढत असते. माणूस वयाने मोठा होत असतो. पण तो जेव्हा विचारांनी थकतो तेव्हा तो खरा वृद्ध होतो. अडीच-तीन वर्षांपूर्वी आपण एक नवे समीकरण जन्माला घातले. महाविकास आघाडीच्या रुपात आपण हे समीकरण यशस्वीपणे चालवले होते. मात्र हे पाहून एखाद्याला पोटशूळ उठणे साहजिक आहे. याच कारणामुळे आता सरकार पाडण्यात आले. सरकार पाडण्यासाठी किती खालची पातळी गाठण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला.
-
“नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही माहिती नसते. पण आता मर्दांच्या हातात मशाल देण्याची नियतीची इच्छा आहे,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे गटाला लक्ष्य केलं.
-
पुढे ते म्हणाले “प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला न्यायालयात जावं लागत आहे. मैदानासाठीही न्यायालयात जावं लागलं. हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही यापेक्षा एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे”.
-
“मला आल्यानंतर फारुख साहेब भेटले. वयाचं आणि महाराष्ट्र ते काश्मीर अंतर जास्त असल्याने आमची फार काही गाठभेट होत नाही. पण बाळासाहेब आणि त्यांची चांगली मैत्री होती. आल्यानंतर त्यांनी मला अजिबात घाबरु नकोस, वडिलांसारखा लढ सांगितलं. मी काही लढाई सोडणार नाही. अशी अनेक वादळं शिवसेनेने अंगावर घेतली आहेत. पण त्यावेळी वादळं निर्माण करणारेही सोबत लागतात आणि ते आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
-
Photos: Video Grab

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य