-
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
-
“एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे, मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.
-
यावेळी आंबेडकरांनी एसटी कर्मचारी स्वार्थी आहेत, असाही आरोप केला. ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
-
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ पाहिजे. मात्र, दुसरीकडे एसटीची चोरी होत आहे याबद्दल हे एसटी कर्मचारी बोलत नाहीत.”
-
“एसटी कर्मचारी स्वार्थी आहेत, केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत. ते या लुटीवर बोलत नसतील, तर तेही या लुटीत सहभागी आहेत,” असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.
-
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणुकीत कोणाशी युती करणार यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “पहिलं प्राधान्य कोणाला हा विषय नाही. वंचित बहुजन पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर युतीचा प्रस्तावर आल्यास विचार करू अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही.”
-
“जो कोणी पहिला प्रस्ताव देईल आणि जो प्रस्ताव सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची आम्ही भूमिका घेऊ,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केलं.
-
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यांना जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेही नको आहेत.”
-
“हे ओझंही त्यांना उतरवायचं आहे. त्यांना परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसली तर ते निवडणुका घेणं पसंत करतील,” असं आंबेडकर यांनी म्हटलं.
-
“आत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि भाजपाची युती होते का हे पाहावं लागेल,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.
-
अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे.”
-
“या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असं आंबेडकरांनी सांगितलं.

हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर