-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांचे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.
-
प्राध्यापक आर्डे ८२ वर्षाचे होते. त्यांचे इच्छेनुसार मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे भारती हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात आले.
-
प्राध्यापक आर्डे यांनी भौतिकशास्त्राचे (फिजिक्स) विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून ३२ वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा केली होती.
-
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सातारा येथे अंनिसच्या कार्याला सुरुवात केली आणि आर्डे यांनी १९८५ पासून अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रबोधन व कृती कार्यक्रमात योगदान देण्यास सुरुवात केली.
-
प्राध्यापक आर्डेंनी बुवाबाजी संघर्ष वैज्ञानिक जाणिवा शिबिरे, शाळा महाविद्यालयातून अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्याने, लेखन याद्वारे अंधश्रद्धांच्या विरोधात सातत्याने संघर्ष केला.
-
त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर ‘हसत-खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन केले.
-
या प्रयोगाचे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हजारभर प्रयोग झाले.
-
बालचित्रवाणीवर या नाट्यप्रयोगाचे अनेक वेळा प्रसारण झाले.
-
सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ अंनिसच्या कामाला वाहून घेतले होते.
-
ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे १९ वर्षे संपादक म्हणून काम केले.
-
ते १९९५ पासून महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात सहसंपादक होते.
-
२००२ पासून ते २०१९ पर्यंत आर्डेंनी प्रमुख संपादक पदाचा कार्यभार सांभाळला.
-
अखेरच्या काळात ते वार्तापत्राच्या सल्लागार पदावर कार्यरत होते.
-
त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये व वार्तापत्रांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक जाणिवा या विषयावर विपुल लेखन केले.
-
त्यांनी दाभोलकर सोबत लिहलेल्या ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह, पूर्णविराम’ या राजहंस प्रकाशने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या ३० हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
त्यांनी खगोलशास्त्र, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मा पुर्नजन्म, प्लॅन्चेट, मुलांसाठी सोप्या भाषेत हसत खेळत विज्ञान या विषयावर पुस्तके लिहिली आहेत.
-
छद्मविज्ञान या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता.
-
त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे, अनेक संस्था चे पुरस्कार मिळाले होते.
-
प्रा. आर्डे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
-
त्यांना मराठा समाज सांगली, पी. डी. पाटील कराड गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
-
त्यांचे पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
-
प्राध्यापक आर्डे यांनी अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम (डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा.प.रा.आर्डे), विज्ञान व अंधश्रद्धा (महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ अनुदान पुरस्कृत), आत्मा-पुनर्जन्म – प्लँचेट, वेध विश्वाचा मानवी शौर्याचा या ग्रंथांचं लेखन केलं.
-
प्राध्यापक आर्डे यांच्या निधनानंतर सामाजिक क्षेत्रातून आदरांजली दिली जात आहे.
-
वैज्ञानिक दृष्टिकोन तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कामाचंही कौतुक होत आहे.
-
विशेष म्हणजे प्राध्यापक आर्डे यांनी समाजातील अंधश्रद्धांचं निरसन करणारं साध्यासोप्या भाषेतील विपूल लेखन केलं.
-
प्रबोधनाच्या कामाचा भाग म्हणून ते स्वतः शाळा महाविद्यालयात गेले.
-
त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला.
-
तसेच नव्या पिढीत तार्किक विचार शक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. (सर्व फोटो सौजन्य – राहुल थोरात, अंनिस)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित