-
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे दसऱ्या मेळाव्यातील त्यांच्या भाषणानंतर चर्चेत आल्या.
-
१९८४ साली त्यांच्या जन्म लातूर जिल्ह्यातील मुरुड गावातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्या उत्तम लेखिका आणि कवयित्रीही आहेत.
-
त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असून भटक्या विमुक्तांसाठीच्या चळवळीत त्यांनी काम केलं आहे.
-
उत्तम वत्कृत्व, पुरोगामी विचार, भाषणातील आक्रमकता या सगळ्यामुळेच त्या श्रोत्यांचं लक्ष वेधून घेतात.
-
कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसलेल्या सुषमा अंधारे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील चर्चेचा चेहरा बनल्या आहेत.
-
नुकतंच त्यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी सुषमा अंधारेंनी त्यांच्या बालपणीचा एक हृद्यद्रावक प्रसंग सांगितला.
-
त्या म्हणाल्या, “भटक्या विमुक्त जातीतील असल्याने आमची घरची परिस्थिती फारच बेताची होती. शाळेत असताना वर्गातील सगळी मुले डबा आणायची. त्यांच्या डब्यात चपाती असायची”.
-
पुढे त्यांनी सांगितलं, “मी ठरवलं आपणही डबा न्यायचा. पण माझ्या घरी चपाती नाही तर भाकरी केली जायची. पण भाकरी कशी नेणार? रात्रीची भाकरी सकाळी डब्यात नेली तर त्याचे तुकडे व्हायचे”.
-
“पण एके दिवशी घरी चपात्या बनवल्या गेल्या. त्यादिवशी मी रात्रीच डब्याला चपाती नेण्यासाठी बाजूला काढून ठेवली. पण चपाती न्यायला डबा नसल्याने एक कापड मी स्वच्छ धुवून त्यात चपाती बांधून दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेले”, असं त्या म्हणाल्या.
-
पुढे त्या म्हणाल्या, “त्यावेळी शाळेत सगळ्यांचे डबे वर्गाच्या बाहेरील खिडकीजवळ ठेवले जायचे. पहिल्यांदाच शाळेत मी डबा घेऊन गेल्यामुळे माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मी शाळेतील मधली सुट्टी होण्याची वाट बघत होते”.
-
“खाण्यासाठी सुट्टी झाली आणि मी माझा डबा(कापडात गुंडाळलेली चपाती) घेऊन आले. मी डब्यात चपाती आणली आहे, हे मला दाखवून खायचं होते. मी वर्गातील इतर मुलांकडे कोण कोण माझ्याकडे बघत आहे, हे पाहत होते”, असंही पुढे त्यांनी सांगितलं.
-
पुढे त्या म्हणाल्या, “मी इकडे-तिकडे सगळ्यांकडे बघत चपातीचा तुकडा मोडला आणि तोंडात टाकला. तुकडा तोंडात टाकल्यानंतर मला कळलं त्या चपातीला मुंग्या आल्या होत्या. नंतर मी तोंडावर मारायला लागले”.
-
शाळेतील हा हृद्यद्रावक प्रसंग सांगताना सुषमा अंधारेंना अश्रु अनावर झाले. “माझा इथे पोहोचण्यापर्यंतचा प्रवासा अशा प्रसंगातून झालेला आहे. माझ्यासारख्या मुलीला तुम्ही ईडीची भीती काय दाखवता?”, असंही त्या म्हणाल्या.
-
नुकत्याच ठाणे येथे केलेल्या भाषणात सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य