-
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपा नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना श्रेय देत आहेत. राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. दरम्यान या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
-
अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर मंथन करत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.
-
निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगताच शरद पवारांनी “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल,” असं सांगितलं.
-
“माझी भाजपाकडे कोणतीही मागणी नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे असं शरद पवारांनी सांगितलं.
-
उशिरा झाला असला तरी निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले.
-
“कोणाच्याही सांगण्याने झालं असेल तरी माझी हरकत नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर शंका उपस्थित करण्याची गरज नाही. ही वर्षं दीड वर्षांची निवडणूक होती. जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्यानंतर आपण असाच निर्णय घेतो,” असं शरद पवार म्हणाले.
-
दरम्यान माघार घेण्यासाठी आवाहन करण्यास उशीर झाला का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “माझ्या दृष्टीने निर्णय झाला हे महत्वाचा आहे. हे असे निर्णय पटकन होत नसतात. त्यासाठी चर्चा, अभ्यास करावा लागतो”.
-
भाजपा उमेदवारी मागे घेतल्याचं श्रेय राज ठाकरे यांना देत असल्याबद्दल विचारलं असता त्यांनी “कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही,” अशी मिश्किल टिप्पणी केली.
-
उद्धव ठाकरेंनी कोणतंही आवाहन केलं नव्हतं असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले ‘खरं तर उमेदवारी अर्ज मागे घ्या हे त्यांनी सांगायची गरज नाही. जेव्हा एकच वर्षाचा कालावधी मिळत असेल. अन् त्या कुटुंबाचा सदस्य लढत असेल तर माघार घेतली पाहिजे”.
-
“आता निवडणुकीत जे उभे आहेत त्या इतर लोकांनीही माघार घेतली तर बरं होईल. त्यांनी माघार घेतली तर निवडणूक होणार नाही. ज्यांनी अर्ज भरला त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही आवाहन करणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
-
राज ठाकरेंनी भाजपाला लिहिलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंबंथी विचारलं असता शरद पवारांनी आपण त्या खोलात जाऊ इच्छित नसल्याचं म्हटलं.
-
भाजपाची माघार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले “५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आला. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत”.
-
मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. ते भाजपाचे आणि युतीचे उमेदवार होते. त्यांच्यासंबंधी ही शंका घेण्याची गरज नाही”.
-
भाजपाने आपल्या पत्राची दखल घेत अंधेरी पूर्व् विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत.
-
“काल केलेल्या विनंतीली मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार,” असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
-
“चांगली, सकारात्मक संस्कृती सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न मनसे म्हणून आम्ही कायमच करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार,” असंही राज यांनी म्हटलं आहे.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल