-
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विरोधक ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. शेतकरी प्रतिक्षेत असताना राज्य सरकारकडून मदतीची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
-
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
-
“या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत,” अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
-
सोनारी,नाशिक येथे समृद्धी महामार्गाच्या अडचणींबद्दल उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाचे कॉंट्रॅक्टर असलेल्या तोमर नामक इसमाने बंदूकीचा धाक दाखवून धमकवल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून समजले असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
-
सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील संपत रामनाथ शिंदे व दत्तात्रय धोंडू शिंदे या शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन भेट घेतली अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
-
अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन धीर दिला. बळीराजा व्यथीत आहे,अडचणीत आहे,पण महाराष्ट्राचा अन्नदाता हरलेला नाही,शिवसेना त्याच्यासोबत आहे असं आदित्य म्हणाले आहेत.
-
धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
आदित्य ठाकरेंनी नाशिक जिल्ह्यातील पांढुर्ली गावच्या स्थानिकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले आणि त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेतले.
-
कोणीही धीर सोडू नका, उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवलं आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं.
-
“गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, पण मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
-
हक्काची जमीन महामार्गाला दिल्यावर शेतकऱ्यांची मात्र कुचंबणा होताना दिसत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट एकत्र बळीराजावर कोसळतंय, खोके सरकार मात्र थंड आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.
-
२०१९ जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान धारगाव तालुका संगमनेर येथे वटवृक्षाचे रोप लावले होते. आज दौऱ्यावर असताना या रोपट्याचा वटवृक्ष झालेला पहिला असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
-
आदित्य ठाकरे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील वडगावमध्येही पोहोचले होते. अस्मानी संकटाला सामोरं जाताना खचून जाऊन टोकाचे पाऊल उचललेल्या कै.दशरथ केदारे यांच्या कुटुंबाला भेट दिली, धीर दिला. मुलांनी शिक्षण सोडू नका. आम्ही पक्ष म्हणून सोबत आहोतच, पण त्याही आधी माणूस म्हणून तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं.
-
आदित्य ठाकरेंनी यावेळी शिवजन्मभूमी तालुका जुन्नर येथील आळेफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला
-
आदित्य ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.
-
मलठण, ता. शिरुर, जि. पुणे येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. घटनाबाह्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे अतिवृष्टीनंतर एकही पंचनामा न झाल्याची व्यथा शेतकरी बांधवांनी यावेळी बोलून दाखवली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
-
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी शिंदे ग्रामस्थांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला मदत सोडा, मुख्यमंत्री भेटायला पण आले नाहीत, असं गाऱ्हाणं मांडलं.
-
(Photos: Twitter)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती