-
राज्यासह अमरावतीमधील वाढता जातीय तसंच धार्मिक संघर्ष आणि गढूळ राजकीय स्थितीवर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी भाष्य केलं असून, यासाठ आम्ही राजकारणीच दोषी असल्याचं म्हटलं आहे. हा सार्वत्रिक बदल असून त्यासाठी रचनात्मकपणे काम केलं पाहिजे असंही ते म्हणाले आहे. ‘एबीपी माझा’कट्ट्यावर बोलताना बच्चू कडू यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
अमरावतीमधील सध्याच्या राजकीय तसंच सामाजिक स्थितीसंबंधी विचारण्यात आलं असता आम्ही राजकारणीच त्यासाठी दोषी आहोत असं ते म्हणाले.
-
“एखादा मुद्दा आपण उचलला पाहिजे असं वाटत राहतं. शेतकऱ्यांचे मुद्दे उचलून धरण्यापेक्षा धार्मिक मुद्दे उचलले असते तर अधिक मजबूत झालो असतो असं वाटत राहतं. मंदिर, मशिदीवर बोललो तर सोबत चार पाच लोक उभे राहतात. हाच आपला तारणहार आहे, हिंदू, मुस्लिम, बौद्धांचा डॉन आहे असं वाटतं. त्यात वेगळी मजा असते. सोपे राजकारण करणारे त्यात सहज जातात. तळागाळातील मुलं जमा करतात आणि ते घेऊनच राजकारण होत आहे अशा भावना तयार होतात. त्यामुळेच मग असं राजकारण होतं,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-
“रक्तदान शिबीर घेणं फार कठीण आहे, पण ढोल वाजवायला लगेच तयार होतात. प्रसारमाध्यमांमध्ये पण तेच दिसतं. मी कानाखाली मारली, तर १० वेळ दाखवता पण रक्तदान केलं तर एकदाच दाखवता. कारण पाहणारी लोकंही तशीच आहेत. यामुळे लोक हेच पाहतात हाच आपल्या सर्वांचा भ्रम झाला आहे. यासाठी आपण सगळेच दोषी आहोत,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-
“देशात धर्मावरुन वाद झाल्याचं आपण पाहिलं आहे, पण शाळेवरुन एकही वाद झाल्याचं कधी ऐकलं आहे का?,” अशी विचारणा बच्चू कडू यांनी केली आहे.
-
“आम्ही शाळेत डबा पार्टी ठेवली होती. पण त्याची बातमी होत नाही. त्यामुळे हा सार्वत्रिक बदल असून त्यासाठी रचनात्मकपणे काम केलं पाहिजे,” असं मत बच्चू कडूंनी मांडल.
-
“मोदींना आता तिरंगा आणला आहे, मी तर याआधीच माझ्या गावात मशिदीवर तिरंगावर फडकावला आहे,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-
“राष्ट्रभावना जपताना आपल्या धार्मिक भावना कठोर करु नयेत. जर धार्मिक भावना कठोर होऊन राष्ट्रीय भावना अडचणीत येत असतील तर त्याला काही अर्थ नाही,” असंही ते म्हणाले.
-
“एकच धर्म दोषी यासाठी दोषी नाही. मोठ्या नेत्यांनी हे थांबवायला हवं,” असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं.
-
तुम्ही मंत्री असतानाही अधिकाऱ्यांना कंटाळून शिंदे गटात गेलात का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “उद्धव ठाकरेंबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील. पण ते ‘मातोश्री’वर जितके शोभून आणि मजबूत दिसत होते तितके ते ‘वर्षा’वर नव्हते, हे खरं आहे. मी ते अनुभवत होतो. मी अंपगांचे दोन, तीन मुद्दे घेऊन गेलो होतो पण त्यासंबंधी बैठकाच झाल्या नाहीत,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-
“मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेटले होते. पण सत्ता असतानाही काही राजकीय, राज्य स्तरावरील तसंच मतदारसंघातील विषयांवर योग्यपणे काम झालं नाही. तुम्ही आता राज्यमंत्री आहात. सत्तेत आहात तर मग हे का करत नाही? असं लोक विचारतात. अपंग, दिव्यांग बांधव फोन करुन आपली एकही बैठक झाली नाहीत असं म्हणायचे. या सर्व गोष्टी खटकत होत्या,” असं बच्चू कडूंनी सांगितलं. हा सर्व नवा कारभार असल्याने उद्धव ठाकरेंना अडचण होत होती. मी त्यांना दोष देणार नाही असंही ते म्हणाले.
-
मला गुवाहाटीहून परत यायचं होतं “मी २० ते २५ वर्षांपासून काम करत आहे. आमचा बापजादा कोणीही राजकारणी नाही. पैसा, जात-पात, धर्म कधीही राजकारणात आणला नाही. कोणत्या पक्षाचा पाठिंबाही घेतला नाही. आम्ही काही तत्वं जपली आहे. पण राजकारणात रणनीती आखताना काही तत्वं बाजूला ठेवावी लागतात, त्याचं दु:खही असतं. पण आता व्यवस्थाच इतकी बदलली आहे की समुद्रात गोड पाणी टाकण्याला अर्थ नाही,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
-
“राजकुमार म्हणून आमचे एक आमदार आहेत, ते सर्वात आधी गुवाहाटीला गेले आणि नंतर मी गेलो. भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
-
(File Photos: Facebook)
