-
शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
-
सर्वच स्तरावरून अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.
-
औरंगाबादमध्ये आज एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अपशब्दांचा वापर केला होता.
-
सुप्रिया सुळेंनी खोक्यांवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी “इतकी भि** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं विधान केले होते.
-
अब्दुल सत्तारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान, आज अब्दुल सत्तरांच्या मुंबईतील घरावर राष्ट्रवादी कडून मोर्चा काढण्यात आला होता.
-
यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली.
-
या दगडफेकीत त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.
-
दरम्यान, या आंदोलनानंतर पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
-
संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार कुठंही फिरले तरी, त्यांना अशाच आक्रोशाचा सामना करावा लागेल.
-
जर राज्य सरकारने अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा घेतला नाही, तर त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही.
-
त्यामुळे अब्दुल सत्तारांनी आपले शब्द मागे घ्यावे आणि त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
-
अब्दुल सत्तारांच्या या विधानानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना इशारा दिला आहे. “शिंदे सरकारमधील मंत्री सातत्याने राजकारणातील महिलांविषयी सातत्याने अपशब्द वापरत आहेत. आज अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. तुम्ही माफी जरी मागितली, तरी यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.
-
तर अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल वापरलेले अपशब्द २४ तासांच्या आत मागे घ्यावे आणि दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल, असा अल्टिमेटम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी सत्तार यांना थेट इशारा दिला आहे. “कृषिमंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला शोभणारं नाही. सत्तारांनी सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नये. आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुकाट्याने सहन करू असं होणार नाही. महिला सन्मानाच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपाला हे कसं चालतं?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “अब्दुल सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा बोलण्याचा उद्देश तो नव्हता,” असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
-
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
-
तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. “सुप्रिया सुळेंबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. अब्दुल सत्तारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे सत्तारांनी आता राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
-
तसेच “हा भाजपाचा युएसपी आहे. भाजपा महिलांना दुय्यम वागणूक देते. त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन हीन दर्जाचा आहे. त्यामुळे भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक, त्यांनाही भाजपाचा गुण लागला आहे”, असेही त्या म्हणाल्या.
-
भाजपा नेत्या पंकजा मुंडे सत्तारांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने महिलेविषयी किंवा पुरुषांविषयी आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे, असं माझं मत आहे. जर टीकेची पातळी घसरत असेल तर ती अयोग्य आहे”, असे त्या म्हणाल्या.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल