-
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत हत्या केल्याचं प्रकरण सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे.
-
आफताबने गळा आवळून श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिल्याचं तपासात समोर आलं आहे.
-
आई-वडिलांपासून दूर दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धाने पालकांच्या विरोधाला न जुमानता डेटींग अॅपवर भेटलेल्या आफताबवर विश्वास ठेवला आणि ती लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये त्याच्याबरोबर राहत होती.
-
मात्र दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरुन अनेकदा वाद व्हायचे. मागील काही महिन्यापासून श्रद्धाशी संपर्क न होऊ शकल्याने श्रद्धाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताबला अटक करुन चौकशी केली असता त्याने धक्कादायक घटनाक्रम सांगितला.
-
श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१८ पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती.
-
मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती.
-
त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता.
-
तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन तसेच सर्व समाजमाध्यमांची खाती बंद होती. यामुळे तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली.
-
विकास यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरु झाला. माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते.
-
‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली.
-
पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.
-
श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्या च्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली.
-
तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे.
-
‘डेक्सटर’ ही अमेरिकन क्राइम थ्रिलर बेव सिरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले.
-
श्रद्धाला तिच्या जिवाला धोका असल्याचा अंदाज पूर्वीच आला होता असं तिच्या मित्राने दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होतं आहे.
-
श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नादरने श्रद्धासंदर्भात तिच्या पालघरमधील कुटुंबियांना कळवले होते. श्रद्धा अडचणीत असल्याचं लक्षात आल्यानंतर लक्ष्मणने तिच्या घरच्यांना कळवलं होतं. सप्टेंबर महिन्यापासून श्रद्धा कुठे आहे? काय करतेय याची कोणतीही माहिती समोर न आल्याने या प्रकरणामध्ये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला होता.
-
लक्ष्मणने श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा वाद व्हायचे असं सांगितलं. “एकदा तिने व्हॉट्सअपवर माझ्याशी संपर्क साधला होता आणि माझी घरातून सुटका करं अशी मागणी केली होती. त्यावेळेस तिने मी याच्याबरोबर आज रात्री थांबले तर तो मला मारुन टाकेल, असंही म्हटलं होतं,” अशी माहिती लक्ष्मणणने दिली.
-
या मेसेजनंतर लक्ष्मण त्याच्या काही मित्रांबरोबर श्रद्धाच्या छत्रापूर येथील घरी गेला आणि त्याने आफताबला पोलीसांकडे जाण्याचा इशारा दिला. “मात्र श्रद्धाने आफताबविरोधात पोलीसांकडे जाण्यासंदर्भात सहमती न दर्शवल्याने आम्ही प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत नेलं नाही,” असं लक्ष्मण म्हणाला. मागील दोन महिन्यांपासून श्रद्धाने संपर्क करणं बंद केल्याने आपल्याला तिची चिंता वाटत होती असं लक्ष्मणने सांगितलं.
-
“तिने माझ्या मेसेजेसला रिप्लाय करणं थांबवलं. अखेर मला फार चिंता वाटू लागली. मी तिच्या आणि माझ्या ओळखीतल्या काही कॉमन फ्रेण्ड्सकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मी तिच्या भावाला याबद्दलची कल्पना दिली. मागील काही महिन्यांपासून तिच्याशी संपर्क झालेला नाही. आपण पोलिसांची मदत घेतली पाहिजे, असं तिच्या भावा कळवलं,” अशी माहिती लक्ष्मणने दिली.
-
“श्रद्धा आणि आफताब हे २०१८ पासून रिलेशनशीपमध्ये होते. सुरुवातीला ते फार आनंदात होते. त्यानंतर आफताब आपल्याला मारहाण करतो असं श्रद्धा सांगायची. तिला त्याच्याबरोबर नव्हतं राहायचं. तिला त्याला सोडायचं होतं. मात्र असं करणं तिला जमलं नाही आणि ते नोकरीच्या निमित्ताने दिल्लीला स्थायिक झाले,” असं श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने एएनआयशी बोलताना सांगितलं.
-
या प्रकरणातील आरोपी असलेल्या आफताब अमीन पूनावाला याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आफताबने गुगलवरुन या हत्येसंदर्भातील माहिती शोधल्याचा जबाब नोंदवला आहे.
-
रक्त साफ करण्यासाठी काय करता येईल इथपासून ते मानवी शरिराची रचना कशी असे इथपर्यंत अनेक गोष्टी आफताबने गुगलवर शोधल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.
-
आफताबने १८ मे रोजी वसईकर असलेल्या श्रद्धाची दिल्लीमधील राहत्या घरी हत्या केली. त्यानंतर पुढील अनेक दिवस तो श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं काम करत होता.
-
मृतदेहाची विल्वेहाट लावण्यासाठी आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटर क्षमतेचा एक फ्रिजही विकत घेतला. तसेच तपासादरम्यान आफताबने पोलिसांना आपण गुगलवर मानवी शरीराच्या रचनेसंदर्भात सविस्तर वाचन केल्याचीही कबुली दिली.
-
पोलिसांनी आफताबच्या मालकीचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलीस आफताबच्या मालिकेच्या गॅजेट्सची तपासणी करत आहेत.
-
हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगलातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध ठिकाणी फेकून देत मृतदेहाची विल्हेवाट लावली.
-
यासाठी त्याने मोठा फ्रिज, पॉलिथीन बॅग घरी आणल्या होत्या. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. घरामध्ये मृतदेहाच्या तुकड्यांमुळे दुर्गंधी येऊन म्हणून तो घरात नेहमी आगरबत्ती लावत असे असंही तपासामध्ये समोर आलं आहे.
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब गुगलवर सर्च करुन पुरावे मिटवायचा. यामध्ये फरशीवरील रक्ताचे डाग कसे पुसावेत, यासाठी कोणते रसायन वापरावे, रक्ताचे डाग पुसलेल्या कपड्यांची विल्हेवाट कशी लावावी यासारखे सर्च आफताबने गुगलवर केल्याचं समोर आलं आहे.
-
१८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह घरातील बाथरुममध्ये ठेवला होता. श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. २०१८ पासून या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. घरच्यांनी विरोध केल्याने दोघे आधी मुंबईत एकत्र राहत होते. नंतर ते नोकरीनिमित्त दिल्लीला स्थायिक झालेले.
-
श्रद्धाचा गळा दाबून तिला ठार केल्यानंतर आफताबने जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामधून मोठा फ्रिज विकत घेतला. त्यानंतर त्याने बाथरुममध्ये ठेवलेला श्रद्धाचा मृतदेहाचे घरातच तुकडे केले. हा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवता यावा यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे केले.
-
पुढील १८ दिवसांमध्ये तो रोज मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे वेगवेगळ्या भागांमध्ये टाकत होता. तो पॉलिथीन बॅगमधून तुकडा घेऊन जायचा आणि जंगली भागामध्ये भिरकावून द्यायचा. मात्र हा तुकडा टाकताना तो पॉलिथीन बॅगसहीत फेकायचा नाही. तुकड्याची लवकर विल्हेवाट लागावी म्हणून तो नुसता तुकडाच फेकून द्यायचा अशी माहिती समोर आली आहे.
-
आफताबने ज्या ठिकाणी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याची कबुली दिली आहे. त्या ठिकाणी आज पोलीस त्याला घेऊन गेले.
-
पोलिसांनी या जंगलांमध्ये जाऊन आफताबसमोर येथील परिसराची पहाणी करुन श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेतला. (सर्व फोटो एएनआय आणि सोशल मीडियावरुन साभार)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO