-
वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आफताब अमीन पूनावालाने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.
-
मृत तरुणी वसईची असून तिचं नाव श्रद्धा वालकर असं आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे.
-
श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१९पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता.
-
आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता.
-
श्रद्धाचा फोन तसेच सर्व सोशल मीडियावरील सर्व खाती बंद असल्याचं मित्राने तिच्या वडिलांनी सांगितलं. यामुळे तिच्या वडिलांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली.
-
माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळलं.
-
याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले.
-
परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला.
-
दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.
-
श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाडय़ाच्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली.
-
हत्या केल्यानंतर आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणालाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.
-
मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.
-
पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता.
-
रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा मेहरोलीच्या जंगलात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे.
-
कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.
-
‘डेक्स्टर’ ही अमेरिकन क्राइम थ्रिलर बेव सिरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले.
-
रक्त साफ करण्यासाठी काय करता येईल इथपासून ते मानवी शरिराची रचना कशी असे इथपर्यंत अनेक गोष्टी आफताबने गुगलवर शोधल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.
-
पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं फार कठीण होतं असं म्हटलं आहे.
-
हे निर्घृण कृत्य करणं आपल्यासाठी फार सोपं नव्हतं अशी कबुली आफताबने दिली आहे. मृतदेहाचे तुकडे करण्याआधी आपण दारु पित होतो, तसंच दुर्गंध येऊ नये यासाठी तोंडावर मास्क किंवा कपडा बांधत होतो असं त्याने सांगितलं आहे.
-
आपण हे नेमकं काय करुन बसलो आहेत आणि कशात अडकलो आहोत हा विचार करुन आपण सारखं रडत होतो असंही त्याने सांगितलं. पण अटक होण्याच्या भीतीपोटी त्याने न थांबण्याचं ठरवलं होतं.
-
सूत्रांच्या माहितीनुसार, जिथे मृतदेहाचे तुकडे केले त्याच खोलीत आफताब झोपत असे. तो नेहमी फ्रीज उघडून श्रद्धाचा चेहरा पाहत असे आणि नंतर स्वच्छता करत असे.
-
आफताबचे अनेक मुलींशी संबंध होते अशी माहितीही समोर येत आहे.
-
श्रद्धाची हत्या केल्यानंतर तो आपल्या प्रेयसीला घेऊन घरी आला होता. यावेळी तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्येच होते.
-
आफताबने ज्या ठिकाणी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याची कबुली दिली आहे. त्या ठिकाणी आज पोलीस त्याला घेऊन गेले होते.
-
श्रद्धाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला आफताबला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे
-
आपली मुलगी जिवंत असेल अशी आशा अद्यापही कायम असून पोलीस आफताबने दिलेली माहिती पडताळून पाहत असल्याचं विकास वालकर यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की “पोलिसांना अद्याप फक्त आठ ते १० तुकडे सापडले आहेत. तो मुंबई पोलिसांसमोर खोटं बोलला आणि दिल्ली पोलिसांसमोर लगेच गुन्हा कबूल केला हे कसं काय शक्य आहे?,” अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
-
यावेळी त्यांना आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे असं विचारण्यात आलं असता, फासावर लटकवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. फाशीपेक्षाही काही भयंकर शिक्षा असेल तर ती शिक्षा आफताबला दिली पाहिजे असा संताप यावेळी त्यांनी व्यक्त केला.
-
“जर त्याने मृतदेहाचे तुकडे केले असतील तर त्याचेही तुकडे झाले पाहिजेत. फाशी द्या, त्यापेक्षाही भयंकर शिक्षा असेल तर ती द्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
पुढे ते म्हणाले “आफताबने जे काही सांगितलं आहे त्याची अद्याप खात्री झालेली नाही. जर ते खरं असेल तर त्याला फासावर लटकवलं पाहिजे,” असं ते म्हणाले आहेत. श्रद्धाच्या वडिलांनी यावेळी २०२१ मध्ये मुलीशी शेवटचं बोलणं झाल्याची माहिती दिली.
-
(Photos: ANI/Social Media)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल