-
आज पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रबोधन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी शिंदे फडणवीस सरकारसह केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.
-
यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून खोचक टोला लगावला.
-
चंद्रकांत पाटलांवर ज्याने शाईफेक केली, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुळात शाई फेकल्याने कोणी मरतं का? त्यातही चंद्रकांत पाटील यांच्या सारखा मजबूत व्यक्ती? असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
-
पुढे बोलताना त्यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपा सरकारवरही निशाणा साधला.
-
”जामीन मिळू नये म्हणून ईडीची कारवाई करायची आणि लोकांना अडकून ठेवायचं. ईडीचा धाक दाखवून कुटुंब उद्धवस्त करायची, एवढंच काम सध्या देशात सुरू आहे”, अशी टीका त्यांनी केली.
-
अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही आजारी आहेत. अनिल देशमुखांना ईडीच्या केसमध्ये जामीन मिळाला आहे, तरी सुद्धा त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
-
यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग गुजरातला जाण्यावरूनही मोदी सरकारला लक्ष केलं. ”राज्यातून एक-एक उद्योग बाहेर जात आहेत. मुंबईत डायमंड मार्केट सुरतला गेलं आहे, टाटा एअरबस आणि फॉक्सकॉन सारखे प्रकल्पही गुजरातला गेले आहेत. मुंबईची सर्व बंदरे अदानीला दिली आहेत.”
-
आज महाराष्ट्रात येऊन हजार कोटींचा प्रकल्प देऊ सांगत आहेत, म्हणजे तुम्हाला अडीच लाख कोटींचा फॉक्सकॉन आणि आम्हाला पॉपकॉर्न द्या, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
-
पुढे बोलताना, त्यांनी शिंदे सरकारला लक्ष केलं. काल परवा मला ऐकायला आलं की आता औरंगाबादमधील वाघ राज्याबाहेर नेऊन तिकडून कोल्हे पाठवणार आहेत. या राज्यात नेमकं चाललंय का? उद्योग गुजरातला जात आहेत, गावं कर्नाटकमध्ये जात आहेत आणि मंत्री गुवाहाटीला जात आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल