-
खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. तसेच परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
-
“ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत,” असं सूचक वक्तव्य करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
-
राऊतांच्या या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या आमदारांनीही राऊतांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य – एएनआय वृत्तसंस्था)
-
“दिशा सालियनप्रकरणी AU कोडवरून टीका झाली. त्याला ES कोड पुढे करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न राऊत करत आहेत, त्यांनी आधी सांगितलं होतं की, सीबीआयने चौकशी केली आहे. आता सीबीआयने उघड केलं की, अशी कोणतीही चौकशी केलेली नाही. म्हणजे यांनाच पूर्ण माहिती नाही. त्यांची माहितीच अपुरी असल्यामुळे अशी वक्तव्ये करावी लागत आहेत. प्रत्युत्तर द्यायचं म्हणून ते ईएस कोडचा आरोप करत आहेत,” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी यांनी दिली आहे.
-
तसेच “खासदार विनायक राऊत किंवा खासदार संजय राऊत यांना रोज एक विषय पाहिजे असतो. यांना पक्षाचं काहीच देणंघेणं नाही. त्यांचा पक्ष संपत चालला आहे याची त्यांना चिंता नाही. त्यांना आरोप करण्यात रस आहे, अशी टीकाही त्यांनी राऊतांवर केली आहे.
-
ठाकरे गट अडीच वर्षे सत्तेत होते. या अडीच वर्षाच्या काळात ईएस कोण, डीएस कोण किंवा आणखी कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता, असेही ते म्हणाले.
-
तर “ठाकरे सेनेला एका मांडींवर काँग्रेसने आणि दुसऱ्या मांडीवर राष्ट्रवादीने बसवलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे दत्तक घेतलं आहे. जयंत पाटील माध्यमांसमोर उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना असल्याचं म्हणतात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने यांना दत्तक घेतल्यासारखं आहे”, असं प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
-
दरम्यान, संजय राऊतांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होते आहे ही मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरं जाऊ शकतो. आमचं पारदर्शक सरकार आहे, असे ते म्हणाले.
-
तसेच ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. एक आरोप केला होता त्यात तोंडघशी पडले. कोर्टाने त्यांना जागा दाखवली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO