-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या १०० व्या वर्षी आज दुःखद निधन झाले. अहमदाबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिराबेन मोदी यांनी आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दिला होता. काही वेळा मोदींच्या निर्णयावर टीकाही झाली. पण त्या प्रत्येकवेळी हिराबेन मोदी यांनी मात्र आपल्या मुलाची बाजू उचलून धरली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय म्हणून ८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटबंदीकडे पाहिले जाते. एका रात्रीत नोटबंदी करुन मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सुरुवातील या निर्णयावर टीकाही झाली. देशभरात सर्वच घटकांतील लोकांना बँकांच्या बाहेर रांग लावावी लागली होती. या रांगेत जेव्हा हिराबेन मोदी देखील उभ्या राहिल्या, तेव्हा सर्वांनीच त्यांचे कौतुक केले होते.
-
नव्या नोटा मिळवण्यासाठी हिराबेन यांनी १५ नोव्हेंबर २०१६ रोजी रांगेत उभे राहून आपल्या जवळ असलेले ४५०० रुपये बदलून घेतले होते. जर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आईच जर रांगेत उभी राहून नोटा बदलत असेल तर आपल्यालाही रांगेत उभे राहण्यास हरकत काय? असा संदेश सर्व देशवासियांना देण्यात आला. बँकेने नव्या नोटा दिल्यानंतर हिराबेन मोदी यांनी बँकेच्या बाहेर येऊन त्या नोटा सर्वांना दाखवल्या होत्या.
-
२०२० साली जेव्हा पहिल्यांदा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. तेव्हा हिराबेन मोदी यांनी स्वतःच्या बचतीमधून २५ हजार रुपये पीएम केअर फंडासाठी दिले होते. एकाबाजूला विरोधक या फंडावर टीका करत असले तरी हिराबेन मोदी यांनी आपल्या कृतीतून सामाजिक भान जपले होते.
-
करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी २२ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली होती. देशभरात अगदी कडकडीत बंद पाळून जनतेने या निर्णयाला पाठिंबा दिला. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आरोग्य दूत, डॉक्टर, पोलिस यांना सन्मान बहाल करण्यासाठी थाळ्या वाजवण्यात आल्या होत्या. मोदींच्या या निर्णयात देखील हिराबेन सहभागी झाल्या आणि त्यांनीही थाळी वाजवून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
-
राम मंदिर निर्माण हा भाजपाचा मुख्य अजेंड राहिला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये जेव्हा अयोध्या येथे राम मंदिरांचे भूमिपूजन होत होते, त्यावेळी हा कार्यक्रम हिराबेन मोदी टीव्हीवर लाईव्ह पाहत होत्या. एकप्रकारे त्या देखील या स्वप्नपुर्तीत सामील झाल्या.
-
पंतप्रधान पदासारख्या उच्च पदावर बसूनही मोदींनी कुटुंबाला आपल्यापासून दूरच ठेवले होते. आपण प्रधान सेवक असून देशातील जनतेचे नोकर आहोत, हेच ते सांगत आले. फक्त २०१६ मध्ये एकदाच ते आपल्या आईला घेऊन पंतप्रधान निवासात गेले होते. त्यावेळी स्वतः त्यांनी आईला आपले घर दाखवले होते.
-
२०१४ पासून दोन लोकसभा निवडणुकांना नरेंद्र मोदी समोर गेले आहेत. त्याशिवाय गुजरातच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या. प्रत्येक निवडणुकीच्यावेळेस नरेंद्र मोदीजी गुजरातमध्ये जाऊन आईचे आशीर्वाद घेत होते. हिराबेन देखील वृद्ध असून मतदानाला बाहेर पडत होत्या.
-
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान सुरु केले होते. या अभियानात देखील हिराबेन मोदी सहभागी झाल्या आणि त्यांनी भारताचा ध्वज फडकवला.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”