-
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठं काम केलं.
-
अंनिसच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्रात जादुटोणा कायदाही झाला.
-
या कायद्यामुळे सर्वसामान्यांच्या फसवणुकीला रोखण्यासाठी मोठी मदत झाली.
-
मात्र, याच कामासाठी डॉ. दाभोलकरांना आपला जीवही गमवावा लागला.
-
त्यांच्या आठवणीत आता ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ संघटनेने कोल्हापूरमधील शाहू स्मारक, दसरा चौक येथे ‘कसोटी विवेकाची’ प्रदर्शनाचं आयोजन केलं.
-
ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं.
-
जे जे कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांचे जीवन विचार आणि कार्य यांचं हे प्रदर्शन साकारलं आहे.
-
या प्रदर्शनाला मेघा पानसरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
-
यावेळी राजन गवस म्हणाले, “जेव्हा राज्याची ‘कल्याणकारी व्यवस्था’ म्हणून भूमिका संपताना दिसते, कोणताही पक्ष जनतेचा विचार करत नाही, शब्द निष्प्रभ होतात आणि माणसं बोथट होत जातात, अशा काळात समाजाच्या जाणीव आणि नेणीव बदलण्याची शक्यता, अशा कलाकृतीच करू शकतात.”
-
“या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करून “बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात तरूण पिढीपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे हे प्रदर्शन आहे. यापुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चळवळींना यातून प्रेरणा मिळते”, असंही राजन गवस यांनी नमूद केलं.
-
या कलाप्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरोज पाटील होत्या.
-
“सध्याच्या परिस्थितीत मी खूप अस्वस्थ होते. आमच्या मागच्या पिढीने चांगल्या कामाची बीजं रोवली. या प्रदर्शनातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचता येईल”, असा विश्वास सरोज पाटील यांनी व्यक्त केला.
-
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकारी व्ही. बी. पाटील, प्रा. विलासराव पोवार, अनिल चव्हाण, हमीद दाभोलकर, सीमा पाटील आणि फ्रेंड्स ऑफ दाभोलकर गटाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
-
बाळासाहेब मुल्ला यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. वैष्णवी पोतदार या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले याच्या जीवनावर एकपात्री सादरीकरण केले.
-
विज्ञानवादी विचार आणि विवेकवादी जीवनशैली यांचा प्रसार करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रात्यक्षिकं, भाषणं, लेखन, संघटन, आंदोलन, कायद्याबद्दल इत्यादींच्या माध्यमातून ४० हून अधिक वर्षं अथक कार्य केलं.
-
हे कार्य, संघर्ष, ‘कसोटी विवेकाची’ कला प्रदर्शनात सादर केलं आहे. हे प्रदर्शन ५ जानेवारीपर्यंत चालणार असून १० ते ७ सर्वांसाठी विनामुल्य खुलं आहे. (सर्व फोटो सौजन्य – अंनिस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख