-
उद्धव ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
-
या विधानानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांच्यात युती होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
-
दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली.
-
आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात. मात्र, निवडणुकीवेळी एकत्र येतात. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ असतो. त्यामुळे आमचा वंचित बहुजन आघाडीला विरोध नाही. ते महाविकास आघाडीचा भाग झाल्यास आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
पुढे बोलताना त्यांनी शिंदे-कवाडे गट युतीबाबतही भाष्य केलं. निवडणुकीच्या वेळी भीमशक्ती आपल्या बरोबर असावी, असं प्रत्येकाला वाटतं. कोणी प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केली, कुणी कवाडे यांना घेतलं, कुणी आठवले यांना घेतलं. खरं तर रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटांनी एकत्र यावं, पण सध्या ते शक्य वाटत नाही, असे ते म्हणाले.
-
अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाजारांबाबत केलेल्या विधानाबाबत बोलताना ते म्हणाले, अजित पवार यांनी कधीही संभाजी महाराजांचा अपमान केला नाही. राज्यपालांसह भाजपाच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे या मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे.
-
शरद पवारांना जाणता राजा म्हटल्याने शिवाजी महाजारांचा अपमान होतो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन आहे. कारण जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वीच्या भाषेत जाणता राजा म्हटले जात होते. शरद पवारांनी सरकारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. त्यामुळे त्यांना जाणता राजा का म्हणू नये?
-
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांनी खोचक शब्दात टीका केली. ज्याला जिथे जायचं आहे, तिथे जा. काशी, रामेश्वर, अष्टविनायक सगळीकडे फिरून या. मात्र, राज्यातला कामाचा झपाटा कमी होऊ देऊ नका, असे ते म्हणाले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”