-
संजय राऊत यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी नारायण राणे आणि शिंदे सरकारसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीकास्र सोडलं.
-
राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली.
-
पुढे बोलताना राज्यातील सरकार घटनाबाह्य असून हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे परिवर्तनाच्या दिशेने चालले आहे. २०२४ किंवा त्यापूर्वीसुद्धा हे परिवर्तन होऊ शकते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
राज्यातील सरकार व्हेंटिलेटरवर असून लवकरच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील. एका सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवलं की ‘हे राम’ नक्की आहे”, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
-
दरम्यान, राज ठाकरे २०२३ मध्ये पहिली सभा शिवसेना भवनासमोर घेणार आहेत, याबाबत विचारलं असता, शिवसेना भवनाविषयी सर्वांनाच प्रेम आहे. अनेकांचा जीव तिकडे अडकला आहे. आम्ही शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर रोज सभा घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
तसेच राज ठाकरेंना महापालिकेने परवानगी दिली, तर त्यांना सभा घेऊ द्या आणि ही परवानगी त्यांना मिळणारच आहे. शेवटी त्यांचे सरकार आहे. हे सर्व भाजपा पुरस्कृत आहे. परवानगी आम्हाला मिळत नाही. कारण सरकारला आमची भीती वाटते, ज्यांची सरकारला भीती नसते, त्यांना कुठंही लघुशंका करण्याची परवागनी मिळते, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.
-
पुढे बोलताना त्यांनी भाजपा नेते नारायण राणेंच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलं. आज माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना भेटून संजय राऊतांबद्दल माहिती देईन, अशी प्रतिक्रिया दिली होती.
-
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ”राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधीही त्यांना भेटलो नाही. मी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांचं तोंडही मी बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा झाली हे चांगलं लक्षण आहेत.”
-
दरम्यान, या वादाची सुरूवात नारायण राणेंनी केली असून त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर घाणेरडे आरोप केले. त्यामुळे धमक्या दादागिरीच्या गोष्टी आमच्यासमोर करू नका, आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं आहे, असेही ते म्हणाले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख