-
करोना काळात डॉक्टर आणि नर्सेस पळून जात असताना त्यांची मनधरणी करुन त्यांच्याकडून काम करुन घेणे कठीण काम होते. मात्र, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी काम केले, त्यावर भाजपाने त्यांचे आभार मानले पाहीजेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं.
-
संजय राऊतांच्या या विधानावर अनेक डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता. तसेच संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली होती.
-
दरम्यान, या विधानावर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
डॉक्टर पळून गेले नाही, तर डॉक्टरांची कमतरता होती, असं मला म्हणायचं होतं. करोना काळात देशभरात डॉक्टरांची कमतरता होती. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला वैद्यकीय सुविधा पुरवल्या. त्यामुळे डॉक्टरांचा अपमान करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
-
माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असेही ते म्हणाले.
-
करोना काळात डॉक्टकरांनी देवदुताप्रमाणे काम केलं, ते पांढल्या कपडल्यातले देवदूतच होते, हे आम्ही वारंवार म्हटलं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
-
यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांच्या तैलचित्राबाबत राजकारण होत असल्याचा आरोप केला. सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावत आहे आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते, त्यांना सन्मानाने बोलवत नाही. याचा अर्थ राजकारण सुरू आहे, असे ते म्हणाले.
-
उद्धव ठाकरे म्हणातात की राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे, यात तथ्य आहे. आम्ही जेव्हा सावरकरांचे तैलचित्र लावलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं. ही या राज्याची परंपरा राहिली आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही परंपरा पाळल्या जात नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
-
दरम्यान, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावलं गेलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं नाही का? असं विचारलं असता, फडणवीस असं काही करतील, असं वाटत नाही. ते हे बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रात बदला आणि सूड घेण्याचं राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
-
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई विद्यापीठाची संरक्षक भींत तोडल्याचा आरोप युवासेनेच्यावतीने करण्यात आला आहे. यावरून त्यांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं.
-
भाजपाने मागच्या वेळी सुद्धा विद्यापीठात घाण आणि गोंधळ करून ठेवला होता. पंतप्रधानांची सुरक्षा सर्वोच्च आहे, याबाबत दुमत नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने काही अडचणी असतील तर त्यांची सभा दुसऱ्या ठिकाणी ठेवता आली असती, यासंदर्भात आता सरकारने उत्तर द्यावं, अशी प्रतिक्रियाही संजय राऊत यांनी दिली.
-
तसेच पंतप्रधान मोदी ज्या कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यातली बरीचशी कामं महाविकास आघाडीच्या काळात झाली आहे, याचाच अर्थ ते आम्ही केलेल्या कामांवर शिक्कामोर्तब करत आहेत, असेही ते म्हणाले.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख