-
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आज (सोमवार) स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ७.८ मॅग्निट्यूडच्या या भूकंपाच्या धक्क्यांनी तुर्कस्तानासह मध्यपूर्वेतील अनेक देश हादरले आहेत. या भूकंपात तुर्कस्तान आणि सीरियामध्ये तब्बल ६०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर २,५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
-
या भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दोन्ही देशांमधील स्थानिक प्रशासनांनी बचाव मोहिमा हाती घेतल्या आहेत. अनेक इमारती पडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
-
तुर्कस्तानातल्या भीषण भूकंपात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मोदी यांनी ट्विट केलं आहे की. या भूकंपामुळे झालेली जीवित आणि वित्तहानी पाहून मी दुःखी झालो आहे. यात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी लोक लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो. अशा परिस्थितीत भारत तुर्कस्तानसोबत उभा आहे. या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मदतीसाठी आम्ही तयार आहोत. (PC : Reuters)
-
भूकंपामुळे आतापर्यंत तुर्कस्तानात ३५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर २,३२३ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. कहारनमारस हे तुर्कस्तानातलं भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगितलं जात आहे. (PC : Reuters)
-
तुर्कस्तानात दियारबारिक येथे इमारती कोसळल्याची बातमी समोर आली आहे. या परिसरात मशिदींमधील विश्रांती गृहं लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. (PC : Reuters)
-
तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब इरदुगान यांनी सांगितलं की, ६ वेळा भूकंपाचे धक्के बसले. यापैकी सर्वात मोठा भूकंपाचा धक्का हा ४० सेकंद जाणवत होता. ज्याची तीव्रता ७.८ मॅग्निट्यूड इतकी होती. (PC : Reuters)
-
तुर्कस्तानचे उपराष्ट्रपती फुअत ओकटे यांनी सांगितलं की, भूकंपबाधित भागात बचावकार्य सुरू आहे. जखमींना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.( PC : Reuters)
-
सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर ५१६ लोक जखमी झाले आहेत. (PC : Reuters)
-
सीरियाच्या अलेप्पो आणि हमा या शहरांमधील इमारतींचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. (PC : Reuters)
-
युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला आहे. या भूकंपाचं केंद्र तुर्कस्तानमधल्या गाझियान्टेप या शहरापासून ३३ किलोमीटर अंतरावर तर नूर्दगी शहरापासून २६ किमी अंतरावर असल्याचं सांगण्यात आलं आहे. (PC : PTI)
-
भूकंपाचे धक्के तुर्कस्तानव्यतिरिक्त सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशामध्ये जाणवले असल्याचं सांगितलं जात आहेच. (PC : AP)
-
तुर्कस्तानात यापूर्वी १९३९ साली ७.८ मॅग्निट्युडचा भूकंप झाला होता. या भूकंपात तेव्हा ३२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. (PC : Reuters)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई